महापालिकेकडून कर्मचारी पदोन्नतीच्या परीक्षेवर शिक्कामोर्तब

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


महापालिकेकडून पदोन्नतीसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागातील शस्त्रक्रियागृह सहायकपदावरील बढतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी विभागप्रमुखांकडून सामान्य प्रशासनाने पात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. महापालिकेमध्ये सध्या विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयटीबीपी या देशपातळीवर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आली.

लिपिकपद वगळता सर्व पदांचे निकाल जाहीर झाले असून, कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, विविध विभागांतील 25 टक्के पदे अंतर्गत पदोन्नतीतून भरण्यात येतात. प्रामुख्याने बिगारी, शिपाई, क्लार्क यांसारख्या पदांवर काम करणाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वरच्या पदावर बढती दिली जाते. महापालिकेमध्ये बराच काळ सरळसेवेने भरती झाली नसल्याने पदोन्नतीतून अनेक पदे भरली गेली. मात्र, अनेकदा कामाचा अनुभव नसतानाही काही बोगस प्रमाणपत्रे देऊन पदोन्नती मिळवली जाते. याचा थेट परिणाम विकासकामांवरही दिसून येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर कामामध्ये आणि निर्णयक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी पदोन्नतीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षा घेण्यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती. यावर अखेर शिक्कामोर्तबही झाले असून, त्याबाबतचे आदेशही अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले आहेत.या आदेशानुसार आरोग्य विभागाकडील शस्त्रक्रियागृह सहायकपदावर 25 टक्के पदोन्नतीनुसार महापालिका अस्थापनेवरील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना बढती दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना खात्यातील पात्र कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *