लोकशाही वाचवण्यासाठी शनिवारी पिंपरी मध्ये ‘निर्भय बनो’ जाहीर सभा….

लोकशाही वाचवण्यासाठी शनिवारी पिंपरी मध्ये ‘निर्भय बनो’ जाहीर सभा

पिंपरी, पुणे (दि.३ डिसेंबर २०२४) सध्या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य धोक्यामध्ये आलेले आहे. संविधानाची तोडफोड करत संसदेमध्ये अनेक लोकविरोधी कायदे संमत केले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार इत्यादी मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून नको ते मुद्दे पुढे करून सर्वसामान्य लोकांना गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र सुनियोजित पद्धतीने केले जात आहे. संसदेमध्ये मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना असंविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे. ही परिस्थिती पाहता देशातील लोकशाही धोक्यात आहे असे वाटते या विषयावर जनजागृती करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शनिवारी (दि.६ जानेवारी) सायंकाळी सहा वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी व ॲड. असीम सरोदे यांच्या ‘निर्भय बनो’ अभियानांतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक व ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी पत्रकार परिषदेतील दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मारुती भापकर तसेच ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, प्रकाश जाधव, चेतन बेंद्रे, गणेश दराडे, नरेंद्र बनसोडे, डॉ. मनीषा गरुड, अनिल रोहम, धनाजी येळकर, सतीश काळे, प्रदीप पवार, प्रवीण कदम, रवी नांगरे, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले की, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होत चालले आहे. कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करून, बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. देशातील काही ठराविक भांडवलदारांना आणि गुंतवणूकदारांचे हित साध्य व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात येत आहेत. शेतीचे कंपनीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले कायदे बदलून भांडवलदारांना उपयोगी पडतील असे कामगार कायदे करण्यात येत आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची वाट लावली जात आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय लोकशाहीचा गौरव होतो तीच लोकशाही आता हुकुमशाहीच्या दिशेने प्रवास करत आहे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतले गेले आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशात आणि राज्यात सर्व समाज घटकात भीतीचे वातावरण आहे. जो कोणी सरकार विरोधात बोलेल त्यांना सीबीआय, आयटीची भीती दाखवून गप्प केले जात आहे. याचा निषेध म्हणून आणि सरकारचा भ्रष्टाचार आणि इंडियाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी या निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपवण्याची प्रक्रिया बिनदिक्कतपणे सुरू आहे. सरकारच्या जन विरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्यांना किंवा लिहिणाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत व सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष यांनी शांत राहून चालणार नाही. निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारला पाहिजे. यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
चेतन बेंद्रे यांनी सांगितले की, लाखो शहिदांच्या बलीदानातून मिळालेले स्वातंत्र्य धोक्यामध्ये आलेले असतांना, आज जर आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. यासाठीच प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ अभियानाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर एक चळवळ उभी करण्यात आली आहे.
गणेश दराडे यांनी सांगितले की, या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकार घालविले पाहिजे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच ‘निभर्य बनो’ जाहीर सभेचे शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ‘निर्भय बनो’ अभियानाचे संस्थापक नेते डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असिम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रकाश जाधव यांनी सांगितले की, ही सभा यशस्वी होण्यासाठी व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे राजकीय व सामाजिक प्रबोधन होण्यासाठी पुरोगामी विचारांच्या मित्रांसह, समविचारी पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *