वरळीत पोटनिवडणुकीला सामोरे जावे, म्हणजे पेटती मशाल आहे की चिलीम कळेल; आशिष शेलारांचं ठाकरेंना आव्हान

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


आदित्य ठाकरे यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगून उद्धव ठाकरे यांनी वरळीत पोटनिवडणुकीला सामोरे जावे, म्हणजे पेटती मशाल आहे की चिलीम ते भाजप कार्यकर्ते समोरासमोर लढून दाखवून देतील, असे आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोमवारी दिले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर ‘मशाल भडकली’ असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत दुसरी सभा अंधेरी पूर्वमधील गुंदवली येथे झाली. या सभेत शेलार म्हणाले, अंधेरीचा निकाल शुभसंकेत असून उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले. मुरजी पटेल निवडणुकीला उभे असते, तर आज ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शाखा बंद करण्याची वेळ आली असती. अंधेरीमधील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या सेनेला मते दिलीच नाहीत. नोटाला अधिक मते मिळाली असल्याबाबत आमच्यावर आरोप केला जातो. हा आरोप खोटा आहे. जर भाजपने आवाहन केले असते तर १२ ऐवजी ७२ हजार मते नोटाला मिळाली असती. अंधेरी पूर्व येथे ३१ टक्के मतदान झाले आहे, ७० टक्के मतदारांनी ठाकरे यांच्या राजकारणाला कंटाळून मतदान केले नाही. ही १२ हजार मते नोटाला मिळाली आहेत, ती मते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *