बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 22/06/2021.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राजुद्दीन सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने, शिरूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, यांच्या सहीने हे पत्र देत ही निवड जाहीर केलेली आहे.
मूळचे बारामतीचे असणारे सय्यद, हे कामानिमित्त रांजणगावला आले व शिरुरला स्थायीक झाले. बारामतीचे असल्याने पवार कुटुंबीयांचा त्यांना खूप मोठा आदर राहिला. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व अजितदादा पवार यांच्याशी एकनिष्ठता ठेवली. तोच पायंडा शिरुरला आल्यानंतर, शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखू लागले. राजूद्दीन सय्यद हे विविध सामाजिक कार्यात सहभागी होत, राष्ट्रवादीचा मित्र परिवार जोडला. तसेच शिरूर परिसरात पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेत, त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. ही बाब लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या, शिरूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच जिल्हाध्यक्ष सोहेल खान, दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्या उपस्थितीत देण्यात आले. शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी पशुसंवर्धन सभापती सुजाता अशोक पवार, जिल्हाध्यक्ष सोहेल खान, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या सहकार्यातून ही संधी मिळाल्याचे तसेच “पद, प्रसिद्धी व पैसाच सर्व काही नसतं तर सुसंवाद हा किती महत्वाचा ठरतो याची प्रचिती म्हणजेच मला अपेक्षित नसतानाही, मला मिळालेले हे पद आहे” अशी प्रतिक्रिया, राजूद्दीन सय्यद यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली. या पदाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजातील व तळागाळातील घटकांसाठी काम करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.