नारायणगाव, येडगाव व धनगरवाडी परिसरात निसर्ग कोपला

ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

नारायणगाव ता. २२ (किरण वाजगे)
येडगाव, नारायणगाव, धनगरवाडी , कारखानाफाटा परिसरात मंगळवार दि. २२ दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले . याचा सर्वाधिक फटका नारायणगाव तसेच येडगाव परिसरातील गणेशनगर , धनगरवाडी या भागाला बसला. पाण्याच्या प्रवाहामुळे नुकतेच लागवड केलेले बटाटा बियाणे, कांदा रोपे व ठिबक सिंचनच्या नळ्या वाहून गेल्या.

ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतातील सुपीक माती वाहून गेली. आता पर्यंतचा हा सर्वाधिक मोठा पाऊस झाला असल्याचे जुन्या जाणत्या नागरिकांनी सांगितले
अगोदरच लाॅकडाउन त्यामध्ये अनेकदा आपत्ती तसेच १३ मे रोजी झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी उन्हाळी टोमॅटो या प्रमुख पिकासह बाजरी, भाजीपाला पिके, फळबागा आदी पिकांसह पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे व घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ३ जून रोजी झालेल्या निसर्ग वादळाचा दुसऱ्यांदा फटका या भागांतील शेती पिकांना बसला होता.

मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे नुकतीच लागवड केलेल्या बटाटा, कांदा या प्रमुख पिकांसह काढणी सुरू असलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पाच महिन्यात या भागातील शेती पिकांचे तिसऱ्यांदा नुकसान झाले आहे. त्यामुळे बळिराजा मात्र पुरता हतबल झाला आहे हाता तोंडाशी आलेला घास या ढगफुटीने हिरावून घेतला आहे.

येडगाव, नारायणगाव , धनगरवाडी परिसरात १३ मे व २२ सप्टेंबर दरम्यानच्या पाच महिन्यात तीन वेळा उभ्या पिकांचे नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांचा भांडवली खर्च, कष्ट वाया गेले. दोन वेळा पंचनामे झाले, मात्र, अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. आणि त्यामध्ये या ढगफुटीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *