अथर्व थिएटर्सकडून ” तो मी नव्हेच ” नाटकाच्या आठवणींना उजाळा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ ऑक्टोबर २०२२

चिंचवड


अथर्व थिएटर्स पुणे यांच्या वतीने आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकाच्या हिरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी निवडक प्रवेश, कलाकारांशी गप्पा असे कार्यक्रमाचे स्वरुप होते. चिंचवडच्या पैस रंगमंचावर हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अजरामर नाटक ‘तो मी नव्हेच’ हे गाजले ते  ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेमुळे. पुण्याच्या अथर्व थिएटर्सने नाटकाची पुर्ननिर्मिती करत महाराष्ट्रभर नाटकाचे ३५ प्रयोग केले. या नाटकातील काही निवडक प्रवेश सादर करण्यात आले. यावेळी कलाकारांनी आपले अनुभव कथन करत प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला.

अथर्व थिएटर्सचे प्रमुख डॉ. संजीवकुमार पाटील यांनी नाटकात प्रमुख भूमिका केली आहे. पाटील  म्हणाले की, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी आमच्या संस्थेने सादर केलेला प्रयोग २ वेळा पाहिला. त्याचे कौतुक करत काही सूचना देखील दिल्या. तसेच त्यांच्या घरी बोलावून एकदा चक्क आमची तालीमही घेतली या आठवणी आयुष्यभर पुरणा-या आहेत. त्यामुळे कलाकारांना चांगलाच हुरुप आला.  संस्था म्हणून आम्हाला महाराष्ट्रभर पोहोचण्याची संधी आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

पाटील म्हणाले की, आमच्या  संस्थेने पहिला प्रयोग २० ऑक्टोबर २००७ रोजी चिंचवडच्या मोरे प्रेक्षागृहात सादर केला. सन २००७ ते २००९ या वर्षात साधारण २० ते २५ प्रयोग झाले. तर आजपर्यंत एकूण ३५ प्रयोग सादर झाले आहेत. कॉपीराईटस नसल्याकारणाने पुढे प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही असे त्यांनी नमूद केले.  यावेळी कलाकारांनी सादरीकरण दरम्यान एकंदर प्रवासात आलेले अनुभव कथन केले. यावेळी प्रदीप मुजुमदार, डॉ. निर्मल ढुमणे, डॉ. धीरज कुलकर्णी, अमृता पराग, डॉ. जयंत महाजन, सुमेधा सहस्रबुद्धे, डॉ. सुचेत गवई, रुपाली पाथरे, ऋतुजा जोशी,  तेजस चव्हाण, वैभव भोसले, गौरी लोंढे आदी कलाकारांचा सहभाग होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *