नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व दोन जवान निलंबित…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
राज्य उत्पादन शुल्काच्या जिल्ह्याबाहेरील भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी नारायणगाव येथील बिअरबार व परमिट रूम वर छापा टाकून केलेल्या निरीक्षणामध्ये विना वाहतूक पास मद्यसाठा आढळून आल्याने नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व दोन जवान निलंबित करण्यात आले आहेत.
निरिक्षक जी डी कुचेकर, दुय्यम निरीक्षक ए. इ. तातळे, जवान विजय घुंदरे व दिलीप केंकरे असे राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावच्या निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी छापे टाकून परमिट रूम व बियर बार ची तपासणी केली. यामध्ये २४ व २५ जुलै रोजी शिरूर व नारायणगाव या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये नारायणगाव येथील चार ठिकाणी छापा टाकून उपलब्ध साठ्याची तपासणी केली असता एफ एल ३ अनुज्ञप्तीच्या केलेल्या निरीक्षणामध्ये विना वाहतूक पास मद्य साठा आढळून आला. सदर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अनुज्ञप्त्याचे नियमानुसार नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांची आहे व त्याबाबत त्यांना वेळोवेळी अशा सूचना व आदेश देण्यात आले होते. असे असताना देखील जिल्ह्याबाहेरील भरारी पथकाला नारायणगाव याठिकाणी बिअर बार ची तपासणी करताना स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस न आणल्याचे दिसून आले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला असल्याने तसेच विना वाहतूक पास मद्यसाठा मिळाल्याने राज्य शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे व विना वाहतूक पास परवाना मद्य जे विहीत मार्गाने प्राप्त झालेले नसते त्यामुळे गैरप्रकार घडून मानवी आरोग्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे व ही गंभीर बाब असल्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी काढलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.
ही कारवाई मुंबई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील कणसे, संतोष जगदाळे , संजय खिलारे ,दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, संजय राठोड मुंबई यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *