शिरूर पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी स्वीकारला…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. २४ ऑगस्ट २०२१

शिरूर पोलीस स्टेशनचा पदभार, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी नुकताच स्वीकारला असून, यापूर्वी त्यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे, पोलीस अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केलेली आहे. आता त्यांच्यावर तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिरूर शहर व त्या अंतर्गत येणाऱ्या बेट भाग व मांडवगण फराटा अशा विस्ताराने खूप मोठया भागाची जबाबदारी आहे.
यापूर्वी शिरूर पोलीस स्टेशनची जबाबदारी असलेले पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची बदली पुणे येथे झाल्याने, त्या जागेवर सुरेशकुमार राऊत यांची बदली झाली आहे. एक चांगले व डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने, आता शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या व शहरासह अनेक गावांमध्ये फोफावलेल्या अवैध्य व्यवसाय थोपविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

तसेच शिरूर शहरात अनेक शाळा, महाविद्यालये व महत्वाची शासकीय व खाजगी संस्थांची कार्यालये तसेच मुख्यालये असल्याने, शिरूर येथे तालुक्यातून येणाऱ्या लोकांची खूप गर्दी असते. त्यामुळे शहरात इतस्ततः व नियमबाह्य पार्क केलेल्या वाहनांमुळे रहदारीला त्रास तर होतोच, परंतु त्यामुळे घडलेल्या अपघातांमुळे, काही निष्पाप लोकांचे बळीही गेलेले आहेत.
त्याचप्रमाणे टू व्हीलर व फोर व्हीलर मधून कर्कश्य हॉर्न वाजविणारी तरुणाईही जोर धरत आहे. त्यामुळे शिरूरकरांना तर त्रास होतोच, परंतु जास्त त्रास होतो, ते येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनिंना. त्यामुळे काही चौकांमध्ये टोळक्याने उभे असणाऱ्या अशा हिरोंवर लक्ष द्यावे लागणार आहे.
गुटखा बंदी असतानाही सर्रास विक्री होणारा गुटखा व हातभट्टी यामुळे सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्याने, गुटखा बंदी खरंच शहरात आहे का ? हा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागलेत. तर काही गुटखा विक्रेत्या बहाद्दरांनी आसपास च्या उपनगरांमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर टपऱ्या स्थापल्या असून, आता याचा त्रास अशा उपनगरांनाही होऊ लागला आहे.
शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींनी दारूबंदी केलीय, तरीही गावठी दारू विक्री होत आहे.
सर्वसामान्यांच्या अशा अनेक समस्यांचे निराकरण होणे गरजेचे असून, अशा खमक्या पोलिस अधिकाऱ्याची वाट शिरूरकर पाहात होते. या आधीही अनेक काही चांगल्या व खमक्या पोलीस अधिकाऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळत, अनेक उत्तम उपक्रम राबवत उत्तम कामगिरी केलेली होती.
त्यामुळे आत्ताही तशीच कामगिरी शिरूर वासीयांना अपेक्षित असून, शालेय विद्यार्थीनी व महिलांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा दामिनी पथक, भरोसा सेल किंवा तत्सम विभाग बळकट करणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून महिला पोलीस अधिकाऱ्यांची मागणी येथील विविध महिला संघटना व पक्षांनी सतत केलेली होती. त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनला ते पद मिळालेही आहे. त्यामुळे, आता नवीन पोलीस अधिकारी विविध पक्ष, संघटना व नागरिकांशी कसा सु संवाद राखतात व त्यांच्या असणाऱ्या सुरक्षिततेच्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण करतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *