भक्ती-शक्ती समूहशिल्प परिसर सापडला अतिक्रमणाच्या विळख्यात

१५ नोव्हेंबर २०२२

प्राधिकरण


भक्ती-शक्ती शिल्पसमूह तसेच उड्डाणपूल हे मुंबईहून पुणेकडे जाताना जुन्या महामार्गावरील पिंपरी चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीचे प्रवेशद्वार आहे . सध्या हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे . प्राधिकरण येथील शिल्पसमूहासमोरील उड्डाणपुलाच्या खालील भागात केलेली पे अँड पार्क योजना बारगळल्यानंतर या जागेत सायंकाळी बेशिस्त पार्किंगसह , शिल्पसमूहाभोवती भरणाऱ्या खेळ साहित्य पाळणे , राऊंड खेळणी , आगगाडी तसेच लग्न वरातीचे रथ यांचे गोडाऊन झाले आहे . सोबत इथे फिरणारे उंट , टांगा सफारी यांचे उंट , घोडे इथेच दावणीला असतात.

भिकारी , फिरस्ते , तळीरामांचे हे आश्रयस्थान झाले आहे . यातील काहीजण सायंकाळचा स्वयंपाक तीन दगड मांडून चूल पेटवून करत असल्याने पार्किंगमध्ये धूर पसरतो . परिसर अस्वच्छ , दुर्गंधीयुक्त होऊन बकालपणा वाढून गुन्हेगारीकरण वाढले आहे . तळवडेकडून प्राधिकरणाकडे उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकात शोभिवंत झाडे व हिरवळीत तसेच वरून जाणाऱ्या छोट्या सेतूवरील भागातही रानटी झाडेझुडपे वाढलेली आहेत.

सायंकाळी पाच वाजल्यानंतर शिल्पसमूहाच्या सभोवताली चौपाटी भरलेली असते .याच रस्त्यावरून ट्रान्सपोर्ट नगरीकडे जाणारी अवजड वाहने , कंटेनर , ट्रक , टेम्पो तसेच पी.एम.पी.एल.च्या डेपोकडे जाणाऱ्या बसेस यांच्या सायंकाळी असलेल्या प्रचंड वर्दळीमुळे छोटे – मोठे अपघात झाल्याने ती जागा अपघातग्रस्त बनली आहे . एखाद्या अवजड वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते . तसेच उंट , टांगा , घोडा सवारी लहान मुलांना घेऊन या गर्दीतून मार्गक्रमण करत असतात . या प्राण्यांचे जागोजागी शेण रस्त्यावर विखुरल्याने दुर्गंधी येते . आण्णाभाऊ साठे बस स्टँड हे अतिक्रमणमुक्त , सुरक्षित व स्वच्छ राहिले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *