मानसिक आजाराचे रुग्ण वाढीचे प्रमाण चिंताजनक

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


कोरोना कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम झाला. तर, अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले होते. सध्या उद्योग-व्यवसायात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. मुलांवरील अभ्यासाचा ताण वाढला आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामातून विविध मानसिक आजार बळावत आहेत. अशा परिस्थितीत आपण आपल्या मानसिक समस्यांविषयी बोलते व्हायला हवे. तसेच, वेळीच त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेऊन आवश्यक उपचार करुन घ्यायला हवे. समाजात आजही मनोरुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. हा दृष्टिकोन बदलून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईकांनी पुढे यावे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत.

वाढते ताणतणाव, चिंता, नोकरी-व्यवसायातील जीवघेणी स्पर्धा आदींमुळे शहरात मानसिक आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत व खासगी रुग्णालयांतील मानसोपचार तज्ज्ञांकडे या आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वायसीएम रुग्णालयात दररोज मानसिक विकारावरील ४० ते ५० रुग्णांची तपासणी केली जाते. त्यातील ६० टक्के प्रमाण हे मनोरुग्णांचे तर, ४० टक्के प्रमाण हे व्यसनाधीनतेचे बळी पडलेल्या रुग्णांचे आहे.

सर्वेक्षण काय म्हणते ? कार्यक्रमानुसार, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता सुमारे ८ ते १० लाख नागरिक मानसिक आजाराने त्रस्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर ही बाब नमूद आहे.

मानसिक आजार होण्याची कारणे :

• अनुवंशिकता हे प्रमुख कारण

• वाढते ताणतणाव, बालवयातील दुर्घटनांचा मनावर झालेला परिणाम

• जैविक बदलामुळे संवेदना हरविल्याने मानसिक असंतुलन

मानसिक आजार टाळण्यासाठी काय कराल?

• ताणतणावापासून दूर रहावे.

• सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा.

• दररोज ध्यानधारणा, योगसाधना करावी. छंद जोपासावे.

• कौटुंबिक व सोशल नेटवर्क वाढवावे.

• तणाव असेल तर जवळच्या नातेवाइक, मित्रांशी बोलावे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *