महाराष्ट्र सरकारने राष्ट्रसंत गाडगे बाबांची दशसुत्री असलेली कोनशिला व फोटो मंत्रालयातून काढल्याने परीट समाज आक्रमक

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
०१ ऑक्टोबर २०२२

शिरूर


राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेचा मूलमंत्र शासनाने स्वीकारून, त्यांच्या नावाने ग्रामस्वच्छतेबाबतचे पुरस्कारही शासनाकडून दिले जातात. संत गाडगे महाराजांच्या विचारांची दशसूत्री ही सर्वदूर प्रसिद्ध असून, मुंबई येथे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयात याच दशसुत्रीची कोनशिला लावलेली होती. परंतु ही कोनशिला नूतन मुख्यमत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी काढून टाकल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध होताच, मुंबई येथील परीट (धोबी) समाज कमालीचा आक्रमक होऊन त्यांनी राज्य सरकारचा निषेध करत सरकारविरुद्ध निदर्शने करत, ती कोनशिला आहे त्या जागी पुन्हा लावण्यासंदर्भात मागणी केली.

मुंबई पाठोपाठ परीट समाजाने संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर आंदोलने करत याबाबत शासनाचा निषेध केला. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील परीट समाजबांधवांनीही, मंत्रालयातील कोनशिला काढून टाकण्याचा निषेध करत, तहसील कार्यालयाच्या मार्फत शासनाला एक निवेदन दिलेय. त्यात म्हटलेय की, “जर शासनाने लवकरात लवकर राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या दशसूत्रीची कोनशिला पुन्हा बसविली नाही, तर राज्यातील संपूर्ण परीट समाज हा मंत्रालयावर मोर्चा काढून, जोपर्यंत कोनशिला पुन्हा लावली जात नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल” असा इशाराही या निवेदनात देण्यात आलाय. हे निवेदन शिरूर तालुका परीट (धोबी) समाजाच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयामार्फत शासनाला देण्यात आले. त्याचा स्वीकार तहसीलदारांच्या अनुपस्थितीत अव्वल कारकून निलेश खोडस्कर यांनी केला.

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा

यावेळी शिरूर तालुका संत श्री गाडगेबाबा परीट (धोबी) संघटनेचे अध्यक्ष विकास अभंग, कार्याध्यक्ष गोरखनाथ दळवी सर, उपाध्यक्ष प्रविण शिंदे , शिरूर शहर संतश्री गाडगेबाबा संघटनेचे अध्यक्ष राहुल थोरात, अक्षय अभंग, सुनिल अभंग, काळूराम अभंग, रमेश अभंग, सोनेसांगवीचे माजी सरपंच शंकर शेळके, प्रदीप अभंग, बाळासाहेब अभंग, गोविंद अभंग तसेच ढोकसांगवी व शिरूर येथील अन्य कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *