मांजरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव जवळील मांजरवाडी येथील देव जाळी शिवारात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय मुळे (वय २०) हा तरुण जखमी झाला आहे.पंजाच्या नख्या लागून अक्षय याच्या पाठ व दंडावर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने नशीब बलवत्तर असल्याने अक्षयला जीवदान मिळाले. दरम्यान अक्षय याला उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्याला जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.

दरम्यान नारायणगाव ग्रामिण रुग्णालयाच्या गलथान कारभारा बाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी नाराजी व्यक्त केली असून या बाबत अक्षय म्हणाला दि. २९ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास देवजाळी येथील घराच्या मागील बाजूस असलेले शेतातून घरी येत असताना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला.अक्षयने मागे पाहिले असता बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा केल्या नंतर बिबट्या निघुन गेला. बिबट्याच्या पंजाच्या नख्या लागून अक्षय याची पाठ व दंडावर खोल जखमा झाल्या आहेत. नारायणगाव परिसरातील मीना नदी काठावर असलेल्या वारूळवाडी, मांजरवाडी, नारायणवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, आर्वी ,गुंजाळवाडी, खोडद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. या भागात मागील वर्षभरात बिबट्यांची संख्या वाढली आहे.

नुकतेच वारूळवाडी येथील सबनीस विद्यामंदिर आवारात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या बिबट्याला जाळी लावून वनविभागाने पकडले आहे. त्या नंतर याच परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले. पिंजरा लावणे, पकडणे व अन्यत्र सोडुन देणे.या व्यतिरिक्त बिबट्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. या बाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *