नारायणगाव महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

किरण वाजगे,
कार्यकारी संपादक
१९ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाने १४ सप्टेंबर हिंदी दिवसानिमित्त भारतीय जीवन बीमा निगम,नारायणगाव चे शाखा प्रबंधक सुधीर कांत यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी ‘हिंदी और भारतीय जीवन बीमा निगम’ या विषयाच्या अनुषंगाने हिंदी भाषेचे महत्व सांगून भारतीय आयुर्विमा महामंडळात हिंदी राजभाषेचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे सांगितले. हिंदी दिवसाचे औचित्य साधून एम.ए. हिंदी विषया मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रसंगी यशवंत मानखेडकर (उपसंचालक,नेहरू युवा केंद्र पुणे व मुंबई विभाग युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार) हे उपस्थित होते. त्यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नेहरू युवा केंद्राच्या माध्यामातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवले जातात याची ही माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये हिंदी च्या वैज्ञानिक स्वरुपाविषयी सांगितले की हिंदी उच्चारानुसार लिहिली,वाचली व बोलली जाते .त्यामुळे हिंदी भाषा सहज,सरळ व बोधगम्य आहे. हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ अनिल काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की हिंदी ने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. हिंदी च्या माध्यमातूनच देशाला स्वातंत्र्य मिळून दिले . तसेच आजच्या तंत्रज्ञान युगात ही हिंदी ने व्यापक रूप धारण केलेले दिसते. जसे जनभाषा , संपर्क भाषा, राजभाषा, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया वाणिज्यक भाषा, तंत्रज्ञानाची भाषा. अशा अनेक रूपात हिंदी दिसून येत आहे असे सांगितले. त्यामुळे जागतिकीकरणाच्या युगात हिंदीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कविता वाचन करून मनोगते व्यक्त केली.

या प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंद कुलकर्णी , मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप शिवणे, मराठी विभाग प्रमुख डॉ. मिलिंद कसबे, यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रसूल जमादार ,राज्यशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. राहुल गोंगे, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. ओंकार मेहेर, इतिहास विभागाचे डॉ. उत्तम पठारे, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. श्रीकांत फुलसुंदर,प्रा. गजानन जगताप आदि प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. अनिल काळे , प्रा. प्रतिभा मोहिते, प्रा. अक्षय भोर यांनी केले. सूत्रसंचालन शेख तहेसीन व आभार शिवाजी शेगर यांनी मानले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात हिंदीमय वातावरण तयार झाले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना हिंदी भाषेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *