पुण्याचा पहिलवान अभिजीत कटके हिंदकेसरी!

दि. ०९/०१/२०२३
पुणे


पुणे : रविवारी हैद्राबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरलेल्या अभिजीत कटके याने हिंदकेसरी कीताब पटकावला. त्याने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केला.

अभिजीत पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. या विजयाने अभिजीत याने महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने पटकावला आहे. अभिजीत याने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे.

पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजीतने सोमवीरला आक्रमणाची संधीच मिळून दिली नाही. दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सूचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला. परंतु, अभिजितने त्याला एकही गुण मिळू न देता हिंदकेसरीची गदा पटकावली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *