आळे ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन केल्याने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२२ मार्च २०२२

आळेफाटा


आळे (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीला मध्यप्रदेशातील ग्लोबलाईझ स्किल फाऊंडेशन तर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याचे संस्थेचे कार्यक्रम संचालक अ‍ॅड. संभाजी मोहिते यांनी नुकतेच जाहीर केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात कार्य केलेल्या पंचायतींना हा पुरस्कार दिला जातो. मोहिते म्हणाले, ग्लोबलाईझ स्किल फाऊंडेशन ही (एन.जी.ओ.) संस्था गेले अनेक वर्षे मध्यप्रदेशातील चंदवारा येथे कार्यरत असून गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातही संस्थेचे कार्य सुरू झाले आहे. संस्थेने नुकताच पुणे जिल्ह्याचा दौरा करून घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्याचा आढावा घेतला.

त्या अंतर्गत तीन ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्याचे ठरविले. त्यात आळे (जुन्नर) ग्रामपंचायतीचे काम सर्वोत्कृष्ट असल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका शशी देवी, संवाद संचालक विजय पांडे व प्रा. अजय मिश्रा या तिघांची एक समिती गठित करण्यात आली होती. त्यात ससेवाडी (ता.भोर) ग्रामपंचायतीनेही विविध केलेल्या कामांची पाहणी करून त्यांना द्वितीय तर कान्हेवाडी (ता.खेड) ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला गेला. येत्या २६ मार्चला सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, रसिकराज उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळालेले गावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *