जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिस विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित

संगीता तरडे
विभागीय संपादिका
२३ मार्च २०२२

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या नियोजनातून ०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वाकड पोलिस विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून परि. ०२ चे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे हे होते. कार्यक्रमाच्या विशेष पाहुण्या म्हणून बिजमता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे, अभिनेत्री प्रिया मराठे, बाल मानसशास्त्र तज्ञ डॉ. राणी खेडीकर या उपस्थित होत्या.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सुकन्या कुलकर्णी अँड ग्रुप तर्फे गणेश वंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बीजमाता पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई सोमा पोपेरे, अभिनेत्री प्रिया मराठे, डॉ. राणी खेडीकर यांचा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाकड विभागाचे भरोसा सेल फलकाचे अनावरण पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान डॉ. राणी खेडीकर यांचे ‘ लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण ‘ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. मानसी अँड ग्रुप तर्फे महिला सक्षमीकरण या विषयावर मूकनाट्य सादर करण्यात आले. त्यास उपस्थितांनी व विशेष अतिथींनी प्रोत्साहन दिले. पुणे जिल्हा कुडो संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे व त्यांच्या विद्यार्थिनी यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले, उपस्थित महिलांनी त्यांच्या जागेवर प्रात्यक्षिक करून स्वसंरक्षणाचे धडे गिरविले.

बिजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी त्यांच्या मनोगतात ‘ त्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या असून ग्रामीण व शहरी भागातील महिला जीवनमान यातील फरक सांगितला. ग्रामीण भागातील महिला शारीरिक कष्टाची कामे करतात त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहते. त्याप्रमाणे शहरी भागातील महिलांनीही शारीरिक क्षमता चांगली ठेवावी, सध्याच्या आधुनिक जगात आपण पारंपरिक शेती सोडून रासायनिक खते आणि केमिकल्स यांचा वापर करून अन्नधान्याच्या गुणवत्तेचा नाश केला आहे. यामुळे कॅन्सर सारख्या असाध्य रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यामुळे पारंपारिक बियाणे, सेंद्रिय खते यांचा वापर करून शेती करावी, असे त्यांनी आवाहन केले तसेच त्यांनी शहरी भागातील महिलांना त्यांच्या परसबाग बालकणी येथे पारंपरिक बियाणे वापरून भाजीपाला पिकवावा असे आवाहन केले.

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांनी त्यांच्या मनोगतात महिलांना आपण स्पेशल आहोत असा आत्मविश्वास बाळगावा स्त्रियांनी त्या स्त्री असल्याचा कमीपणा बाळगू नये असे संबोधन केले, स्त्रीयांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं आवाहन देखील करत जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांसोबत काम करत आहेत असे उद्गार काढले.

बाल मानसशास्त्र तज्ञ डॉ. राणी खेडकर यांनी आपल्या मनोगतात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनमानाबाबत तसेच त्यांच्या समस्यांबाबत सांगितले आणि रेड लाइट एरिया मधील देह विक्री करणाऱ्या महिलांचा मुलांच्या आयुष्याबाबत माहिती दिली. स्त्रियांनी समाजामध्ये वावरताना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली पाहिजे. त्याशिवाय महिला सक्षमीकरण होणार नाही असे संबोधन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

प्रमुख अतिथींचे मनोगत व्यक्त झाल्यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सर्वांना संबोधित केले. त्यांनी पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय महिला संरक्षणासाठी बांधील असून महिलांनी अन्याय सहन करू नये असे सांगत तक्रार करण्यासाठी महिलांनी समोर यावे असे आवाहन केले. आयुक्तांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व महिलांना दिला. महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत तक्रार करू शकतात असे सांगितले, त्यांनी भगवद्गीतेतील श्लोक उद्धृत करत स्त्रीयांचे महत्त्व अधोरेखित करणारी स्वरचित गझल सादर केली. त्याला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. महिला सक्षमीकरण याबाबत महिलांनीच अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असेही पुढे आपल्या भाषणामध्ये प्रतिपादन केले. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणारे पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप, दामिनी पथक, भरोसा सेल, महिला बाल संगोपन केंद्र अशा विविध संकल्पनेची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, हिंजवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) रामचंद्र घाडगे, वाकड पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस स्टाफ, वाकड, हिंजवडी, सांगवी भागातील महिला दक्षता समितीच्या सदस्या यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने वाकड हिंजवडी सांगवी परिसरातील महिला उपस्थित होत्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *