कंपनी जगली तरच कामगार जगेल, याचे भान सर्व कामगारांनी ठेवावे – डॉ. कैलास कदम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३ डिसेंबर २०२१

चाकण


चाकण मधील निल मेटल कंपनीत 13500 रुपयांचा वेतनवाढ करार संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर औद्योगिक क्षेत्रात मंदीचे सावट असताना निल मेटल प्रॉडक्ट्‌स लि. कंपनीच्या व्यवस्थापनाने हिंद कामगार संघटनेच्या मागणी पत्रास सकारात्मक प्रतिसाद दिला. आता कामगारांनी देखील क्वॉलिटी आणि क्वॉंन्टिटीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी. कंपनी जगली तरच कामगार जगेल, याचे भान सर्व कामगारांनी ठेवावे आणि देशाच्या औद्योगिक आणि जीडीपी वाढीसाठी खारीचा वाटा उचलावा असे प्रतिपादन हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

चाकण महाळुंगे एमआयडीसीतील निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन आणि हिंद कामगार संघटना प्रतिनिधी यांच्या मध्ये तिसरा वेतन वाढीचा एैतिहासिक करार गुरुवारी (दि. 2 डिसेंबर) संपन्न झाला. यावेळी कामगार नेते डॉ. कैलास कदम, व्यवस्थापनाच्या वतीने कार्पोरेट एच.आर. हेड प्रितपाल खुराना, एच. आर. हेड संजय भसे, एच. आर. असिस्टंट काळूराम रेटवडे, प्लांट हेड मिलिंद जठार, ऑपरेशन हेड संदीप कांबळे, फायनान्स विभागाचे नागराज शेट्टी, प्रोडक्शन हेड सचिन कानाडे आणि हिंद कामगार संघटनेच्या वतीने सरचिटणीस यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, गणेश गोरीवले, कामगार प्रतिनिधि संतोष पवार, अमोल पाटील, राजेंद्र पातोंड, विलास खरात, दीपक खरात व नवनाथ नाईकनवरे आदींनी सह्या केल्या.

 

ऑगस्ट 2021 पासून प्रलंबित असणारा वेतनवाढ करार 13500 रुपये एकत्रित वाढीने मंजूर झाल्यामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा करार तीन वर्षाच्या कालावधीसाठी लागू आहे. तीन वर्षासाठी दिवाळी बोनस म्हणून 22800 आणि सानुग्रह अनुदान 6000 रुपये दरवर्षी मिळणार आहे. तसेच 50 हजार रुपयांचा फरक रोख स्वरुपात देण्यात येईल. त्याचबरोबर मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत 2 लाख रुपये यामध्ये स्वतः कामगार, पत्नी, 2 मुले व आई, वडील यांचा समावेश असेल. तसेच कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास 11 लाख रुपये किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये देण्यात येतील. तसेच मृत्यू सहाय्य निधीसाठी सर्व कंपनीतील कामगारांचा एक दिवसाचा पगार व कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने दुप्पट रक्कम त्यामध्ये टाकून मृत्यू सहाय्य निधी म्हणून संबंधित कामगारांच्या वारसास देण्यात येतील. मृत्यूसमयी तातडीची मदत म्हणून 15000 रुपये विना परतावा कामगारांच्या वारसास देण्यात येईल. शैक्षणिक बक्षीस योजने अंतर्गत कामगारांच्या पाल्यांना विशेष टक्केवारी प्रमाणे 2000 ते 3500 रुपये पर्यंत बक्षिस देण्यात येईल. सर्व कामगारांनी या कराराबद्दल व्यवस्थापन व हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचे आभार व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *