भाजप नगरसेविका आशा शेंडगे सह ११ जणांना १४ दिवस तुरुंगवास, स्टंटबाजी नडली…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १२ सप्टेंबर २०२१
स्टंटबाजी करत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर काळी शाई फेकून त्यांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांना शनिवार ( दि .११ ) पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आशा तानाजी शेंडगे यांच्यासह दहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा , पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली .
शेंडगे या करायला गेल्या मारूती आणि झाला गणपती अशीच त्यांची अवस्था झाली असल्याचे जाणकार बोलतात. त्यांच्याबरोबर असणाऱ्यांच्या ध्यानी मनीही नसेल की प्रकरण एव्हडे लांब पर्यंत जाईल. नगरसेविकेच्या स्टंटबाजीत सहभागी झालेल्यांची अवस्था ” ना घर का ना घाट का १४ दिन जेल का ” अशीच झाली असून आता १४ दिवस तुरंगवास म्हणजे ऐन सणासुदीला घरच्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार. त्यात गृहिणी असणाऱ्यांना घरापासून एव्हडे दिवस दूर राहणे म्हणजे एक दिव्यच आहे असेच वाटत असणार. त्यात काही सहज गंमत म्हणून बरोबर आलेल्यांना तर मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.


महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील कोणावर एसीबी ची कारवाई तर कोण पक्ष सोडून जातोय. म्हणजेच ही पक्षाला लागलेली गळती आहे . आणि आता नगरसेविकेसह ११ जणांना तुरुंगवास म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला लागलेली ही घरघर आहे असे मानले जाते. व विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिल्याचे जाणकार सांगतात.

शासकिय अधिकारी अशोक मारुती भालकर यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीवर फुले आणि काळी शाई टाकली . टेबलवर ‘ धिक्कार ‘ असे लिहिले . महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी दालनातून बाहेर पडण्यास अटकाव केला . सुरक्षा रक्षक , पोलिसांना धक्काबुक्की करून आयुक्तांच्या नावाच्या नामफलकावर काळी शाई फेकली , असे फिर्यादीत म्हटले आहे . शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती . कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *