प्राधिकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सरकारचे अभिनंदन – सदाशिव खाडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३१ डिसेंबर २०२२

पिंपरी


मागील चाळीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील भूमिपुत्रांना जमिनीचा परतावा देण्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांनी शुक्रवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न पुढील पंधरा दिवसात सोडविला जाईल असे उत्तर दिले. पिंपरी चिंचवड प्राधिकरणातील बाधित झालेल्या भूमिपुत्रांना संपादित क्षेत्राच्या ६.२ टक्के जमीन परतावा आणि दोन टक्के एफएसआय देण्यात येईल याची पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी केली जाईल असेही उदय सामंत यांनी सभागृहात जाहीर केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे आमदार महेशदादा लांडगे तसेच आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे यांचे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी अभिनंदन केले आहे.

याबाबत सदाशिव खाडे यांनी सांगितले की, या विषयावर मी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना देखील नगर विकास विभाग व मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे अनेकदा पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला आहे. यानंतर 1 जुलै 2019 रोजी सायंकाळी पाच वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सन 1972 ते सन 1983 पर्यंत संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीस आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्तात देखील याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. अशा जमीन धारकांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या साडेबारा टक्के जमीन परतावा करण्यासाठी पुरेसे क्षेत्र प्राधिकरणाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या संबंधित क्षेत्राच्या 6.2% एवढी जमीन तिच्या मालकास प्राधिकरणाच्या अटींच्या अधीन राहून वाटप करण्यात यावी. अशा जमिनीचा परतावा करताना दोन टक्के एवढा चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात यावा त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकास प्राधिकरण नियंत्रण नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा असेही या बैठकीतील इतिवृत्त मध्ये नमूद करण्यात आले आहे.

यानंतर महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी दिलीप वणीरे यांच्या सहीने दि. ३० जुलै २०१९ रोजी प्राधिकरण कार्यालयाला बैठकीतील इतीवृत्त आवश्यक त्या कार्यवाहीसाठी मिळाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जुलै २०१९ मध्ये घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी यानंतर आलेल्या सरकारने केली नाही त्यामुळे हा प्रश्न पुन्हा अडीच वर्षे प्रलंबित राहिला होता. आता पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी नागपूर येथील अधिवेशनात लक्षवेधीद्वारे या प्रश्नाकडे पुन्हा सरकारचे लक्ष वेधून घेतले आणि चाळीस वर्षापासून प्रलंबित असणारा हा प्रश्न आता मार्गी लागला आहे त्यामुळे प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपाचे शहर अध्यक्ष तथा आमदारदादा लांडगे यांनी ही नवीन वर्षाची भेट दिली आहे असेही सदाशिव खाडे यांनी सांगितले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *