पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल…कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुलाचे लग्न केले धुमधडाक्यात…

बातमी प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे
दि. ०१ ऑगस्ट २०२१

जुन्नर : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वेगळे नियम आणि राजकीय नेत्यांना वेगळे नियम आहेत का ? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. दोनशे वर्हाडींची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडींच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वरातीती डिजेचा दणदणाट ही केला. 

                  दरम्यान, आता देवराम लांडे यांच्यासह जुन्नर येथील मंगल कार्यालयाचे मालक तसेच व्याही अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जून्नर पोलीसांनी आपत्ती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ संध्याकाळी केवाडी ता. जुन्नर गावामध्ये वरातीसाठी ५०० ते ७०० लोकांचा जमाव जमवुन डीजे वाजवल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार गणेश बाळू जोरी यांनी दिली. त्यामुळे डीजे मालक व देवराम लांडे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झल्यामुळे देवराम लांडे यांच्या विरोधात २४ तासात सलग दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

                  देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण हळू हळू वाढत असल्याचे सरकारी डॅशबोर्ड वरील आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. शाही लग्नसोहळ्याला जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांसोबतच जुन्नर लगतच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. स्वतःच्या हौशेपोटी लोकप्रतिनिधींनाच कोरोनाच्या नियमांचा विसर पडला असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करावी हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

                  कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केले, जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश न जुमानता स्वतःच्या दोन मुलांच्या लग्न सोहळ्यासाठी १८०० ते २००० लोक एकत्र केले असल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली. यामुळे मंगल कार्यालय मालक केदारी, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, दोन व्याही यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *