कारेगावात खोट्या कागदपत्रांद्वारे सरकारी गायरान जमिनी विकल्याचे निष्पन्न होत आहे – माजी सरपंच अनिल नवले

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
कारेगाव : दि. 30/06/2021.

मौजे कारेगाव, ता. शिरूर, जी. पुणे या ग्रामपंचायत हद्दीतील, गट नंबर ७०९ मधील गायरान जमिनीची तात्काळ मोजणी करून, हद्द निश्चित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा कारेगावचे माजी सरपंच अनिल लक्ष्मण नवले, यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे केली आहे.

त्यांनी नुकतीच या संदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, “कारेगाव येथील गट नंबर ६९८ मध्ये प्लॉटिंग पाडून विक्री केली, मात्र प्रत्यक्षात ताबा देताना गायरान जमीन गट नंबर ७०९ चा ताबा दिला असल्याचे दिसत आहे. यासाठी मी गायरान जमिनीची मोजणी करून सीमा निश्चित करावी अशी मागणी वारंवार करत आहे. आत्तापर्यंत चार वेळा मोजणी आली, मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्या नावाचा वापर करून, काही स्थानिक राजकारणी मोजणी अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहेत.” असा घणाघाती आरोप माजी सरपंच अनिल नवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल, यांनी या प्रकरणात लक्ष घालून सरकारी गायरान जमिनीची मोजणी करून, फसवणूक झालेल्याना न्याय देण्यात पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. कारेगाव ग्रामपंचायत हद्दीत वाढती लोकसंख्या पाहाता, कारेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत गरज आहे. या सरकारी गायरान जमिनीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केल्यास नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. मी सरपंच असताना गावच्या विकासासाठी प्राधान्याने लक्ष दिले होते व या पुढेही देतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले नाही आणी यापुढेही घालणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

गेले काही दिवसांपासून कारेगाव हद्दीतील सरकारी मालमत्ता असलेल्या जागांचा विषय चांगलाच तापलेला आहे. मुळात काही स्थानिकांनी इतर जागेचे खरेदीखत दाखवत, प्रत्यक्षात गट क्रमांक ७०९ या सरकारी गटात गुंठेवारी करून, विक्री चालू केल्याची घटना घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. विक्री करताना खरेदीदारांना दुसऱ्या गटाचे खरेदी खत करून दिले जाते व जागा ताब्यात देताना मात्र गायरान गट नं. ७०९ मधील जागा ताब्यात दिली जातेय. या सर्व घडामोडींमुळे कुठेतरी ग्रामपंचायत यांची फसवणूक होत आहे व सरकारी जागेत अतिक्रमण होत असल्याचे, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व कारेगाव चे माजी सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.

Advertise

त्यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप चे जेष्ठ नेते व खासदार गिरीश बापट, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार लैला शेख व उप अधीक्षक भूमी अभिलेख शिरूर यांच्याशी पत्रव्यवहार करून, योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी केली असून, जर येत्या 14 जुलै 2021 पर्यंत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर 15 जुलै 2021 रोजी, मी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *