“नारायण सुर्वे म्हणजे संस्कृतीचा सूर्य!” – प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ मे २०२२

पिंपरी


“कविवर्य नारायण सुर्वे म्हणजे मराठी संस्कृतीचा सूर्य होय! श्रमाचे मूल्य त्यांनी साहित्यात अन् समाजात रुजवले!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड येथे रविवार, दिनांक ०१ मे २०२२ रोजी काढले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि विद्यामंदिर मंडळ संचालित मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय (नेरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, विश्वस्त कल्पना घारे, विद्यामंदिर मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, मुख्याध्यापक पी.बी. विचवे, निमंत्रक सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सबनीस यांच्या हस्ते ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), लेखिका अभिनेत्री प्रा. नेहा सावंत (पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार), बालवाड्.मय लेखिका प्रा. लीला फ. शिंदे (मास्तरांची सावली सन्मान), कवी कमलाकर देसले (कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार – २०२१), प्राचार्य डॉ. संभाजी मलघे (नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार – २०२२) प्रदान करून गौरविण्यात आले.

तसेच महाराष्ट्रातल्या विविध भागांतील ललिता सबनीस (‘मन स्पंदन’), चंद्रशेखर कांबळे (‘शेणाला गेलेल्या पोरी’), सूर्याजी भोसले (‘कालाभूल’), सविता इंगळे उर्फ सावी (‘चाकोरीतल्या जगण्यामधून’), या कवींच्या कवितासंग्रहांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार – २०२१ आणि डॉ. दत्तात्रय जगताप (‘लांझ्या’), डॉ. राजश्री पाटील (‘ती अजूनही जळते आहे’), माधुरी मरकड (‘रिंगण’), रमजान मुल्ला (‘अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत’) या कवींच्या कवितासंग्रहांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार – २०२२ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नितीन हिरवे (संवेदना प्रकाशन) आणि डॉ. दीपक चांदणे (प्रतिमा पब्लिकेशन) या प्रकाशकांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी उद्धव कानडे आणि पुरुषोत्तम सदाफुले लिखित ‘कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर काव्यजागर या कविसंमेलनात नारायण पुरी (‘जांगडबुत्ता’), भरत दौंडकर (‘लेक’), अनिल दीक्षित (‘झिंग झिंग झिंगाट’), प्रा. नेहा सावंत (नारायण सुर्वे लिखित ‘गिरणीची लावणी’), प्रा. लीला फ. शिंदे (‘नदी माउली’), कमलाकर देसले (‘अगा करुणाकरा’), ललिता सबनीस (‘शपथ’), चंद्रशेखर कांबळे (‘शेणाला गेलेल्या पोरी’), सूर्याजी भोसले (‘पुस्तक’), सविता इंगळे (‘सीते’), प्रा.डॉ. संभाजी मलघे (‘मन की बात’), डॉ. दत्तात्रय जगताप (‘शेतकरी बाप’), डॉ. राजश्री पाटील (सिंबॉल’), माधुरी मरकड (‘कटोरा’), रमजान मुल्ला (‘मुलगी म्हणजे गुज बोलते’) यांनी वैविध्यपूर्ण काव्यरचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सत्काराला उत्तर देताना भारत सासणे यांनी, “आशेचा आदिम सूर म्हणजे नारायण सुर्वे यांची कविता आहे!” असे मत प्रकट केले.

नारायण सुर्वे यांच्या “डोंगरी शेत माझं…” या कवितेचे राजेंद्र वाघ यांनी गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. गणेश घारे, प्रा. संतोष तुरूकमाने, बाजीराव सातपुते, संगीता झिंजुरके, मानसी चिटणीस, जयवंत भोसले, वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांनी आभार मानले. अनंत राऊत यांनी प्रभावीपणे सादर केलेल्या “मित्र वणव्यात गारव्यासारखा…” या गझलेने सोहळ्याची सांगता करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *