शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ऍड. वसंतराव कोरेकर यांची बिनविरोध निवड…

विभागीय संपादक
रविंद्र खुडे
शिरूर : 11/07/2021.

     शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. वसंतराव कोरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती पदासाठी त्यांचा एकट्याचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याची घोषणा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरुरचे सहाय्यक निबंधक, शंकर कुंभार यांनी केली.
      या आधीचे सभापती शंकर जांभळकर यांनी, ठरल्याप्रमाणे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला असल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे, १० जुलै रोजी सभापती पदाच्या निवडणुकी करिता अर्ज भरण्याच्या मुदतीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक ॲड. वसंतराव कोरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, ही निवडणूक बिनविरोध झाली.


      शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 19 संचालक असून, यातील 18 संचालकांना मतदानाचा हक्क होता. पणन प्रक्रिया संचालकाला मतदानाचा हक्क नसल्याने, या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, तर भाजपचे 3 संचालक आहेत.
      शिरूर बाजार समिती सभापती कोण होणार यावर शिरूर तालुक्याचे लक्ष लागले होते. आमदार ॲड. अशोक पवार यांच्या शिरूर कार्यालयात बैठक झाली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी फोन वरून चर्चा व सर्व संचालक यांचे मत जाणून घेऊन, नेहमीप्रमाणे निवडणूक निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सभापतीपदी ॲड.वसंतराव कोरेकर यांचे नाव जाहीर केले.
       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार ऍड. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते.
     या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून धैर्यशील (आबाराजे) मांढरे, ॲड. वसंतराव कोरेकर यांची नावे सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. परंतु जसजशी निवडणुकीची तारीख जवळ जवळ येऊ लागली, तसतशी अनेक नावांच्या वावड्या सोशल मीडिया वर उठू लागल्या. त्यात माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे  प्रमुख मानसिंग पाचुंदकर व अन्य काहींची नावे पुढे येऊ लागली.
त्यात आणखी एक घटना महत्वाची ठरली, ती म्हणजे मावळते सभापती की ज्यांनी मागच्या महिन्यात सभापतीपदाचा राजीनामा दिलेला होता, ते म्हणजे शंकर जांभळकर यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकालाबाबत स्मरणिका छापलेली होती. त्या स्मरणिकेचे प्रकाशन जांभळकर व काही नेत्यांनी थेट मुंबईत जाऊन, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते केले होते. सदरील फोटो सोशल मीडिया वर येताच, सर्वत्र चर्चेला उधाण आले आणि ते म्हणजे शंकर जांभळकर यांनी जरी सभापतीपदाचा  राजीनामा दिलाय, तरी त्यांना या पदावर अजून काम करण्याची इच्छा असून, त्यासाठीच ते थेट मंत्रालयातून या दोन नेत्यांकडून फिल्डिंग लावत आहेत.
या चर्चेत आणखी भर घातली, ती म्हणजे भाजप पक्षाच्या नेत्यांनी. कोव्हिड पासून माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे काही बाहेर कुठे सार्वजनिक कार्यक्रमांना फिरताना दिसत नाहीत, त्यामुळे त्यांची जागा सांभाळणारे भाजप चे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे व अन्य काही नेते मंडळींनी वल्गना केली, ती म्हणजे “बाजार समितीचा सभापती भाजप च ठरविणार.”
परंतु केवळ तीनच संचालक असणाऱ्या भाजप चे पदाधिकारी मात्र या निवडणूक प्रक्रियेवेळी कुठे दिसलेच नसल्याने, त्यांनी सोडलेल्या रिकाम्या पुडीचीच सर्वत्र चर्चा चालू आहे.
     परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, जेष्ठ विधितज्ञ व जेष्ठ संचालक्ष ऍड. वसंतराव कोरेकर यांचे नाव जाहीर झाल्याने, गेली पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या वल्गनांवर मात्र पडदा पडला आणि या निवडणुकीत, सभापती पदाची संधी ज्या उमेदवारास द्यायचे ठरलेले होते तो चेहरा अखेर पुढे आला.

       सभापती पदासाठी झालेल्या या सभेवेळी शिरूर हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती प्रकाश पवार, माजी सभापती शंकर जांभळकर, माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, उपसभापती विकास शिवले, माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर, ऍड. वसंत कोरेकर, आबाराजे मांढरे, छायाताई बेनके, तृप्ती भरणे, मंदाकिनी पवार, सतीश कोळपे, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, ऍड. सुदीप गुंदेचा, बंडु जाधव, राहुल गवारे, संतोष मोरे, शिरूर बाजार समितीचे प्रभारी सचिव अनिल ढोकले, जिल्हा परिषद सदस्या सूजाता पवार, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी काळे, जी प सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, पं. स. चे माजी सभापती विश्वास कोहकडे, घोडगंगा सह. सा. कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, महिला तालुकाध्यक्ष भुजबळ, संगीता शेवाळे, तज्ञीका कर्डीले, डॉ. हिरामण चोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
       यावेळी आपल्या भाषणात आमदार ऍड. अशोक पवार म्हणाले की, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावरून काम करताना, शशिकांत दसगुडे व शंकर जांभळकर यांनी अनेक रचनात्मक व भरीव विकासकामांतून बाजार समितीचा लौकिक वाढवलेला आहे. भविष्यात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा, तळेगाव उपबाजारात व्यापारी संकुल अशा मोठ्या योजना विचाराधीन आहेत. बाजार समिती नावारूपाला आली असताना, ज्येष्ठत्वाच्या नात्याने ॲड. वसंतराव कोरेकर यांना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सभापतिपदाची संधी दिली. त्यांनी ज्येष्ठत्वाचा अनुभव वापरून हा विकासाचा गाडा पळता ठेवावा, हीच इच्छा या ठिकाणी आहे.
      शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदासाठी संधी मिळाली असून, शिरूर बाजार समितीची सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेणार असून, बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे व शेतकऱ्याला फायदा होईल असे निर्णय घेतले जातील याकडेच सर्वाधिक लक्ष दिले जाईल. या निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिरूरचे आमदार अशोक पवार या सर्वांचे आभार मानतो, असे नवनिर्वाचित सभापती कोरेकर यांनी मनोगतात आपले विचार व्यक्त केले.
       मावळते सभापती शंकर जांभळकर यांनीही सभापती पदावरून काम करताना सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे  खूप सहकार्य लाभल्याने काम करण्यास ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
       माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाशबापू पवार यांनीही आत्तापर्यंतच्या राष्ट्रवादीच्या सर्व सभापतींच्या कामाचे कौतुक करत, नवीन सभापतींना शुभेच्छा दिल्या.
       राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले की, पुढे येऊ घातलेल्या सहकारातील सर्व निवडणूका, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा प्रत्येक निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष बाजी मारेल, याकडेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
      राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी नूतन सभापतींना शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *