बैलगाडा शर्यत हे भारताचे सांस्कृतिक वैभव : माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० मे २०२२

टाळगाव चिखली


महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत हे भारताचे सांस्कृतिक वैभव आहे. काही विदेशी विचारांच्या प्रवृत्ती या वैभवाला लगाम घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, न्यायालयात आपल्या लढ्याला यश मिळाले. ही बैलगाडा संस्कृती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. त्यासाठी न्यायालयाच्या नियमांचेही पालन केले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा अनुभवला थरार

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने माजी महापौर राहुल जाधव व माजी महापौर नितीन काळजे यांनी भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानवर भरवली आहे. एकूण पाच दिवस असलेल्या शर्यतीतील तिसऱ्या दिवशी (रविवारी) माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे आणि शर्यत आयोजकांचे केले कौतूक

प्रकाश जावडेकर म्हणाले की, मी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना देशातील बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, काही प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या. पण, आमदार महेश लांडगे आणि बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून  न्यायालयीन लढा आपण जिंकला. शेतकरी बैल पळवतो, जोपासतो तसे त्याचे आजारपणही पाहतो. वटपूजा जशी होते तशी आम्ही बैलाचीही पुजा आम्ही करतो. तमिळनाडूत जलीकट्टू आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतीला कंबाला म्हणतात. तसे महाराष्ट्रातील छकडा हे देशातील ग्रामीण संस्कृतीचे वैभव आहे. हे वैभव टिकवण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचेही कौतूक करतो, असेही जावडेकर म्हणाले.

‘ढाण्या वाघा’ने शेतकऱ्यांचा सन्मान केला : सदाभाऊ खोत

बैलगाडा ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे. गावगाड्यात राबणारा शेतकरी बैलांना जीव लावतो. देशी गायीच्या पोटाला जे खोंड येते. त्याला बैलागाडा घाटात पळवले जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या शेतकऱ्याला जणू पाच एकर शेती एकाच वर्षी पिकावी, असे असते. त्यासाठी देशी गाय, गोवंश वाचला पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या मातीतील सुपूत्र प्रकाश जावडेकर दिल्लीच्या तख्तावर सह्याद्रीसारखे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहीले. दुसऱ्या बाजुला बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अविरत श्रम घेतले. विधानसभा सभागृहात विधेयक आणले. शर्यतींवरील बंदी उठवली आणि पुन्हा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही लढा उभा केला. महेश लांडगेंसारख्या ढाण्या वाघाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. एव्हढेच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवून शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला, अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कौतूक केले.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *