वीजग्राहकांना कोरोना काळातील वीजबीलात सवलत द्या…सचिन साठे

वीजबीलातील दंड व्याज रद्द करा, शहर कॉंग्रेसची वीजमंत्र्यांकडे मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २ जुलै २०२१
एमएसएमई, व्यावसायिक, वाणिज्य ग्राहकांचे वीजबील पुर्णता माफ करावे, तसेच लाखो ग्राहकांना चक्रवाढ पध्दतीने आकारलेले दंडव्याज माफ करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी वीजमंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
महाराष्ट्राचे वीजमंत्री नितीन राऊत यांना सचिन साठे यांनी मंगळवारी पुण्यात भेटून शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जेष्ठ नेते गौतम आरकडे, सेवादलाचे मकर यादव, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव आदी उपस्थित होते
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 22 मार्च 2020 पासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पुर्णता किंवा अंशता वारंवार लॉकडाऊन करण्यात येत आहे. आजही पुणे जिल्हा, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरात दुपारी चार नंतर लॉकडाऊन आणि संचारबंदी तर शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णता लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक अडचणित आले आहेत. छोट्या व्यावसायिकांबरोबरच एमएसएमई उद्योजकांचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन, उत्पन्न बंद असतानाही महावितरण कडून किमान वीज वापराची बीले आकारण्यात आली आहेत. हि वीजबीले देखिल जे ग्राहक भरु शकले नाहीत अशा ग्राहकांना मासिक दोन टक्के चक्रवाढ पध्दतीने पुढील महिण्यांची वीजबीले आकारण्यात आली आहेत. ज्या ग्राहकांची थकबाकी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांचा वीज पुरवठा कोणतीही पुर्व सुचना न देता गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांकडून खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये वीज वितरण विभागाविषयी तीव्र नाराजी आहे.

Advertise


या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनता, समाजातील सर्वच घटक आर्थिक टंचाईला सामोरे जात असताना मेटाकुटीला आले आहेत. व्यापारी, एमएसएमईसह घरगुती व व्यावसायिक, वाणिज्य वीजवापर करणारे सर्वच ग्राहक प्रचंड आर्थिक संकटात आले आहेत. त्याचा जास्त परिणाम प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार, अल्प उत्पन्न गटातील वर्गावर होत आहे. अशा ग्राहकांना कोरोना काळातील वीजबीलांबाबत दिलासा द्यावा. तसेच लाखो ग्राहकांना चक्रवाढ पध्दतीने आकारलेले दंडव्याज माफ करावे. त्याबरोबर ज्या काळात शहरात पुर्णता लॉकडाऊन होते. त्या काळातील एमएसएमई, व्यावसायिक, वाणिज्य ग्राहकांचे वीजबील पुर्णता माफ करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी वीजमंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
तसेच माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच आदेश दिले आहेत. की, इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या (आहार) 50 टक्के शुल्क भरणा-या सदस्यांना, मद्य विक्रेत्यांना कोरोना काळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर परवाना शुल्क आणि अन्य करांच्या बाबतीत दिलासा देण्याच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभागाने महिण्याभरात निर्णय घ्यावा. हॉटेल व्यावसायिकांना, मद्यविक्रेत्यांना जर माननीय न्यायालयाच्या आदेशाने करांमध्ये सवलत देऊन दिलासा देण्यात येणार असेल तर, इतर एमएसएमई, व्यावसायिक, वाणिज्य वापर करणा-या वीजग्राहकांना देखिल आपण पुर्णता लॉकडाऊन काळातील वीजबीलात आणि चक्रवाढ पध्दतीने आकारलेल्या दंड रक्कमेत पुर्ण वजावट करुन दिलासा द्यावा. अशीही मागणी आम्ही पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *