सांगलीमध्ये साडेचार कोटी रुपये खर्चून तीन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारणार ; मंत्री विश्वजित कदम

राजू थोरात तासगाव प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यातच कर्नाटक मधल्या बेल्लारी येथून ऑक्सिजनचा होणार पुरवठा थांबला होता. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, पालकमंत्री यांच्याशी बोलून आम्ही धडपड केली. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सद्य स्थितीला जिल्ह्यात कोणतीही ऑक्सिजनची टंचाई नाही अशी माहिती कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. ते सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच भारती विद्यापीठ संलग्नित भारती कॉलेज मार्फत पुणे आणि सांगलीमध्ये प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्चून तीन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या प्लांटचे लवकरच काम सुरु होणार असून यातून दर मिनिटाला १५०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील, मी स्वतः आणि प्रशासनाने प्रयत्न करुन जिल्ह्यासाठी ४४ टन ऑक्सिजन उपलब्ध केला आहे. जिल्ह्याची गरज ४० टन ऑक्सिजनची आहे. जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरीही जिल्ह्यासाठी आजच्या तारखेला १२०० डोस उपलब्ध आहेत. त्यातील ६०० खाजगी आणि ६०० शासकीय रुग्णालयांसाठी आहेत.शासनाच्या धोरणानुसार जिल्हा वार्षिक निधीतील दहा टक्के निधी हा कोविडसाठी खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या वार्षिक निधीतील दहा टक्के म्हणजेच सुमारे ३० ते ३२ कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यात येणार आहेत, असे डॉ. कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *