पिंपळे जगतापचे तलाठी व ग्रामसेवक यांचे निलंबन : गायरान अतिक्रमण प्रकरण आले अंगलट

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
पिंपळे जगताप : दि. 06/08/2021.

पिंपळे जगताप येथील गायरान जमिनीवर, चासकमान धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यानुसार तलाठी जयमंगल धुरंदर आणि ग्रामसेविका सारिका वाडेकर, यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याने, चुकीचे काम करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे, चासकमान धरण प्रकल्पग्रस्तांना आरक्षित केलेल्या जागेवर, स्थानिक ग्रामस्थांनी अतिक्रमण करून घराचे बांधकाम सुरू केले होते. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कोर्टाने जिल्हाधिकारी यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर बुधवार दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पिंपळे जगताप येथील चासकमान धरण प्रकल्प बाधितांसाठी आरक्षित केलेल्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख उपस्थित होत्या. दरम्यान, त्याठिकाणी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना आरक्षित केलेल्या अगोदरच्या गायरान क्षेत्रावर, अतिक्रमण केल्याचे त्याचबरोबर एका घराचे बांधकाम नव्याने सुरू असल्याचे यावेळी समक्ष निदर्शनास आले होते.
त्याचाच अहवाल जिल्हाधिकारी यांनी उच्च न्यायालयात, गुरुवार दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी तात्काळ दाखल केला होता. त्यानुसार, उच्च न्यायालयाने पिंपळे जगताप ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका सारिका वाडेकर तसेच तेथील तलाठी जयमंगल धुरंदर, यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नव्याने सुरू असलेल्या बांधकाम व अतिक्रमणाला, तलाठी आणि ग्रामसेविका यांना जबाबदार धरल्याने, या दोघांचेही निलंबन करण्यात आल्याची माहिती, शिरूर गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिली.

तालुक्यात प्रथमच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एकाच गावच्या तलाठी आणि ग्रामसेविका यांचे एकाच प्रकरणात निलंबन करण्याची ही पहिलीच घटना आहे. तालुक्यातील इतरही अनेक गावांत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई होणार का ? अनेक गावांमध्ये गायरान क्षेत्रावर किंवा प्रकल्पग्रस्तांना आरक्षित केलेल्या जागेवर स्थानिकांनी अतिक्रमणे केली आहेत. गावोगावी अनेकांचे तसे वाद व तक्रारीही संबंधित विभागांकडे आहेत. अशी सर्व अतिक्रमणे, आता जिल्हाधिकारी तात्काळ हटविण्याची कार्यवाही करणार का? किंवा अशा तक्रारींवर आता काय न्याय मिळणार ? याकडेच आता सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *