अल्पवयीन मुलाने चोरलेल्या पाच दुचाकी व मोबाईल नारायणगाव पोलिसांनी केले हस्तगत

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
निमगावसावा व १४ नंबर येथे दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला नारायणगाव पोलिसांनी सोमवार दिनांक १५ रोजी ताब्यात घेतले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव सावा व १४ नंबर या गावांमध्ये संशयित रीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
नारायणगाव पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरल्या बाबत ची माहिती समजली. त्यानुसार निमगाव सावा येथील एका चौकामध्ये दयानंद (नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलाला नारायणगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। मात्र प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला नारायणगाव पोलिस स्थानकात नाव व पत्ता विचारण्यासाठी आणले. यावेळी त्याने निमगाव सावा व परिसरातून मोटर सायकल व मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या पाच मोटरसायकल व ३ चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक संतोष दुपारगुडे, धनंजय पालवे, भीमा लोंढे, दिनेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, शैलेश वाघमारे, सत्यम केळकर, अनिल तांबे व होमगार्ड अक्षय मुळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *