कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

अवसरी खुर्द येथील कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी लागणारे ३ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. तसेच शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कवियत्री शांता शेळके’ सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, तहसीलदार संजय नागटिळक, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, मराठी साहित्य क्षेत्रात मनाचा तुरा रोवणाऱ्या कवियत्री शांता शेळके यांचा जन्म इंदापूर तालुक्यात झाला. त्यांचे बालपण जिल्ह्यासह मंचर परिसरात गेले. तालुक्याच्या याठिकाणी ज्ञान, गुण, कौशल्यवृद्धीसाठी चर्चा, ज्ञान, संवाद, परिसंवाद, व्याख्यान, परिषद अशा प्रकारच्या सांस्कृतिक केंद्राची गरज लक्षात घेऊन शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात ‘कवियत्री शांता शेळके’ यांच्या नावाला साजेसे अत्याधुनिक आणि अतिशय सुंदर असे १ हजार आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. सभागृहाचे उद्घाटन आपल्या जीवनात आनंदाचा, अभिमानाचा आणि कर्तव्यापूर्तीचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळेल. त्यांना चांगल्या व्यक्तींचे विचार ऐकता येईल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. कवियत्री शांता शेळके यांच्या नावाला साजेसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावेत. तसेच सभागृह व परिसर स्वच्छ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांने काळजी घ्यावी,असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

आंबेगाव परिसराचा विकास करण्यासोबत सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. परिसरात विविध विकासकामे चालू असून याचा येथील नागरिकांना लाभ होईल, असेही उमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, अवसरी खुर्द परिसरात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या रूपात वैभव उभे आहे. आज हे एकमेव महाविद्यालय गावाच्या ठिकाणी उभे आहे. आज या ठिकाणी वेगवेगळे संशोधन होत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सभागृहाची आवश्यकता लक्षात घेता हे सभागृह उभारण्यात आले आहे.

काळाच्या ओघात दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय टिकले असून ते चांगले दर्जेदार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. या महाविद्यातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देश विदेशात नोकरी करत आहे. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पाहिजे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

पुणे म्हाडाचे अध्यक्ष श्री. आढळराव पाटील, सह संचालक श्री.जाधव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पानगव्हाणे यांनी विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *