रिझर्व बँकेकडून लाला को-ऑपरेटिव्ह बँकेवरील बंधने शिथिल

नारायणगाव, किरण वाजगे,कार्यकारी संपादक

नारायणगाव येथील अग्रगण्य असलेल्या लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला मार्च २०२३ पासून एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश आले आहे. बँकेची आर्थिकस्थिती व समाधानकारक कामकाज याचा विचार करून सन २०१९ पासून बँकेवर टाकलेली सुपरवायझरी बंधने रिझर्व्ह बँकेने मागे घेतली आहेत.

याबाबत बोलताना बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी सांगितले की, एनपीएचे प्रमाण नियमापेक्षा जास्त असल्याने सन २०१९ पासून रिझर्व्ह बँकेने लाला बँकेवर सुपरवायझरी बंधने टाकली होती. त्यामुळे परवानगीशिवाय सभासदांना लाभांश जाहीर न करणे, कार्यक्षेत्र विस्तार, शाखा विस्तार न करणे आदी स्वरूपाचे निबंध रिझर्व्ह बँकेने घातली होती. रिझर्व्ह बँकेने लाला बँकेच्या आर्थिक व्यवहाराची व प्रशासकीय कामकाजाची तपासणी करून बँकेस तपासणी अहवाल सादर केला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती व समाधानकारक कामकाज याचा विचार करून बँकेवरील सर्व बंधने मागे घेत असल्याचे रिझर्व्ह बँकेने पत्रान्वये बँकेस कळविले आहे. बँकेस रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगचा परवाना प्राप्त होईल. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देता येईल. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम म्हणाले, “बँकेकडे ४२५ कोटी रुपयांच्या ठेवी असून, २८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. एनपीएचे प्रमाण शुन्य टक्के आहे.” उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप मोरे म्हणाले, “बँकेचे सुपरवायझरी निर्बंध उठवल्यामुळे बँकेची कर्जवाटप मर्यादा वाढली असून, वैयक्तिक कर्जमर्यादा ४ कोटी ५० लाख रुपये; तर समूह कर्जमर्यादा ७ कोटी ५० लाख इतकी झाली आहे.”

चौकट..
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था
महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी लाला बैंकस नगर, सोलापूर, सातारा, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये कार्य क्षेत्र विस्तार करण्यास मंजुरी दिली आहे. बँकेची ओतूर येथे नविन शाखा सुरू केली आहे. बँकेच्या चाकण शाखेचे पुणे- नाशिक हायवे, आंबेठाण चौकाजवळ लवकरच प्रशस्त जागेत एटीएम सुविधेसह स्थलांतर होणार आहे.

– जितेंद्र गुंजाळ, उपाध्यक्ष, लाला अर्बन बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *