शेतीपंप व रोहित्र चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल : पीक विम्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीपंप आणी केबलला विमा संरक्षण द्या : निलेश वाळुंज

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे.
शिरूर : दि. ०२/०३/२०२४.
शिरूर तालुक्यात सर्वत्रच खूप मोठ्या प्रमाणावर शेतिपंप व केबल चोरी जाण्याचे सत्र चालू आहे. तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव या तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरटयांनी मोठ्या प्रमाणावर हैदोस घातलेला आहे. याशिवाय जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र (डीपी) चोरून नेल्या असून शेतकऱ्यांसह महावितरणचेही मोठे आर्थिक नुकसान चोरट्यांनी केलेले आहे. विद्युत रोहीत्रे चोरीला गेल्यानंतर नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून मोठा वेळ लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हतबल होऊन अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. कारण या चोऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून, एवढे करूनही पिकांना योग्य बाजारभाव मिळेलच याची खात्री नसते. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत पीके जगवली तरी आर्थिक संकटे उभी असतातच. अशा प्रचंड गंभीर समस्या शेतकऱ्यांसमोर असतात.
त्यामुळे शेतकरी हितास्तव व योग्य उपाय योजनांबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी अनेक दिवसांपासून शासन व स्थानिक प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करत उपोषणही केलेले होते.


त्यामुळे शिरूरचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. त्यात वाळुंज यांनी “पीक विम्याच्या धर्तीवर शेतीपंप आणी शेतीपंपांच्या केबलला १००% विमा संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. तसेच जी रोहित्रे लोकवस्तीपासून दुर आहेत, ती रोहित्रे महावितरणने लोकवस्तीनजीक स्थलांतरीत करून त्यांनाही विमा संरक्षण लागू करण्याची मागणी केलीय.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना कंटाळून चोरीच्या फिर्यादी दाखल करायलाही शेतकरी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑनलाईन तक्रार दाखल करून घेण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशीही मागणी वाळुंज यांच्याकडून करण्यात आलीय.
याच पार्श्वभूमीवर निलेश वाळुंज यांनी सोमवार दि २६ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसिल कार्यालय शिरूर येथे शेतकरी व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या साथीने आंदोलन केल्यानंतर, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन, महावितरण यांची एकत्रित बैठक, गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०१४ रोजी शिरूर तहसिल कार्यालयात शिरूरचे ऊपविभागीय आधिकारी हरेश सुळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनीही अनेक उपाययोजना सुचविल्या. यावेळी ग्रामसुरक्षा दल, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, महावितरणचे शिरूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, शिक्रापूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, अण्णापुरच्या सरपंच दिपीका शिंदे/तायडे, ग्रा. पं. स. अंबादास कुरंदळे तसेच मंगेश कुरंदळे, किरण कुरंदळे, प्रल्हाद पवार, दत्ता बांगर, खंडाळे, निमगाव भोगीचे माजी सरपंच अंकुश इचके, तसेच शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

वाळुंज व इतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या मोटार व केबलला विमा संरक्षण मिळण्यासाठीचा प्रस्ताव, वरीष्ठ कार्यालयामार्फत शासन दरबारी पाठवणार आहे. महावितरणचे कर्मचारी, ग्रामसुरक्षा दल यांना बरोबर घेऊन पोलिस रात्रीची गस्त घालून लवकरच आरोपी गजाआड करतील. यापुढे चोऱ्या रोकण्यासाठी कठोर पावले उचलण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत – हरेश सुळ (उपविभागीय आधिकारी शिरूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *