शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवते – शांतीलाल सुरतवाला

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०८ जुलै २०२२

नारायणगांव


स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. तसेच शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवते. स्त्री शिक्षणाला सहकार्य करणे व प्रोत्साहन देण्याचे काम हे रंगिलदास सुरतवाला ट्रस्ट करीत आहे. मुली स्वावलंबी झाल्या पाहिजेत व स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे म्हणून शिक्षणात कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी सुरतवाला ट्रस्टतर्फे मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींनी या शिष्यवृत्तीचा वापर करावा व शिक्षण घेऊन मोठे व्हावे. शिक्षण माणसाला मोठे करते पैसा देते पण संस्कार सोडू नका, असे मत रंगिलदास सुरतवाला ट्रस्टचे अध्यक्ष व पुण्याचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांनी कुरण येथे व्यक्त केले.


रंगिलदास सुरतवाला ट्रस्ट व आनंद ऋषिजी ब्लड बॅंक पुणे यांच्या वतीने जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले यावेळी ते बोलत होते. पुढे त्यांनी सांगितले की, स्त्री शिक्षणाला आम्ही घरातून सुरुवात केली. घरातील मुलींना उच्चशिक्षित केले. समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी स्वतःच्या कमाईतून मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरु केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, खूप शिका पण वाईट वागू नका कारण जास्त शिकलेला माणूस चांगलेच वागेल असे सांगू शकत नाही. समाजासाठी केलेले कोणतेही कार्य हे सत्कर्म आहे म्हणून वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे. आपण प्रचारी न होता विचारी व्हायला हवे. कारण प्रचारी फक्त अनुकरन करतो पण विचारी मात्र आपला निर्णय स्वतः घेऊन त्याची अंमलबजावणी देखील करतो.


मोठे होण्यासाठी तपश्चर्या करावी लागते आणि शिक्षण ही एक तपश्चर्या आहे व तपश्चर्येचे फळ नेहमी चांगले भेटते. मनुष्याने समाजासाठी काम केले पाहिजे प्रत्येक व्यक्तीने एका व्यक्तीला मदत केली तर समाजाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. रक्तदान ही एक समाजसेवा आहे, यासाठी आम्ही आनंदऋषीजी ब्लड बँक पुणे या संस्थेमार्फत ही सेवा करत आहोत. मी स्वतः १४६ वेळा रक्तदान केले आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करता येऊ शकते मात्र कोणत्या क्षेत्रात काम करायचे हे ज्याचे त्याने निवडले पाहिजे. आज शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत त्यांचा चांगला उपयोग करून समाजासाठी व देशासाठी काहीतरी करा, असेही सुरतवाला यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

या कार्यक्रमात एकूण १४० विद्यार्थ्यांनींना प्रतिवर्षी ६ लाख रुपयांची शिष्यवृती विभागून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अतुल बेनके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे रोपटे वाढत असून आपल्या गुणवत्तेचा ठसा या संस्थेने उमटवला आहे. आज शांतीलाल सुरतवाला ही ट्रस्ट मुलींना आर्थिक मदत करून शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी हातभार लावत आहे. हा हातभार विद्यार्थींनींना आत्मविश्वाासाने उभा करणारा आहे. आज शिक्षणाबरोबरच संस्कार देखील महत्वाचे आहेत आणि शांतिलाल सुरतवाला हे जुण्या पिढीतील एक संस्कारी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे संस्कार आपल्याला दातृत्वाच्या मार्गावर आणणारे आहेत. तसेच पुढील शिक्षण घेताना एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की, इंजिनीयर समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम करतो. तसेच तांत्रिक दृष्ट्या समाजातील अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यावर असे उपक्रम निवडा जे समाजासाठी उपयोगी असतील. यावेळी उपस्थित डॉ. संदिप डोळे यांनी शांतीलाल सुरतवाला ट्रस्ट ही पुण्यात कार्यरत असलेली सेवाभावी संस्था असून त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थेची निवड केली त्याबद्दल संस्थेचे आभार मानले. तसेच सेवाभावी संस्थेकडून मिळणारी मदत ही महत्त्वाची असून त्यांचे ऋण म्हणून आपणही आपल्या पायावर उभं राहिल्यावर आपल्या परीने एखाद्या विद्यार्थ्यास अथवा कुटुंबास सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जितेंद्र गुंजाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, विद्यार्थींनीनी या सेवाभावी संस्थेचे ऋणी राहिले पाहिजे तसेच आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने केले पाहिजे असे सांगून शांतीलाल सुरतवाला यांच्या मार्गदर्शनामुळे व मदतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रोत्साहन मिळते. संस्थेच्या वतीने त्यांनी सुरतवाला ट्रस्ट व आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे आभार मानले. जयहिंद संकुलाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष आंद्रे यांनी विद्यार्थींनीना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून त्यांचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.या कार्यक्रमात जयहिंद शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त जयवंत घोडके तसेच विद्यार्थींनी शरयु खेबडे व संस्कृती हांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य पांडुरंग धुमाळ, शशिकांत सिन्नरकर आनंद ऋषीजी ब्लड बँक ट्रस्टी प्रल्हाद तापकीर, जनसंपर्क अधिकारी सुनील खताळ, चंद्रशेखर भागवत, पत्रकार अमर भागवत तसेच जयहिंद शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त जयवंत घोडके, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, अपर्णाताई घोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयहिंद औ. प्र. संस्थेचे प्राचार्य सुभाष आंद्रे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. हेमंत महाजन यांनी केले तर जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. डी. जे गरकल यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *