विभागीय संपादक रामदास सांगळे
दि.५ :- नगदवाडी (ता. जुन्नर ) येथील स्मशानभूमीजवळ सुखदेव विठोबा जगताप यांच्या गट नंबर ५३९ मधील विहिरीमध्ये रविवार (दि.४) रात्री बिबट्या पडला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि.५) सकाळी विहिरीतून काहीतरी आवाज येत होता म्हणून विहिरीमध्ये जगताप यांनी पाहिले असता त्यांना विहिरी मध्ये बिबट्या पडलेला लक्षात आला. त्यांनी ताबडतोब वनविभागाशी संपर्क साधला. जगताप यांच्या विहिरीला कठडा नसून भक्ष्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे.वनविभागाने तातडीने येऊन दुपारी १ वाजता या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. हा बिबट्या मादी जातीचा मादी असून ती सर्वसाधारणपणे ७ ते ८ वर्षे वयाची पूर्ण वाढ झालेली आहे. नगदवाडी,कांदळी, वडगाव कांदळी या परिसरामध्ये नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. हा बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर काढून पुढील वैद्यकीय उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेला आहे. या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक अरुण देशमुख, कैलास भालेराव,वनसेवक नाथा भोर, बाळू वामन,किसन गुळवे व रेस्कु टीमचे अजिंक्य भालेराव या सर्वांनी मेहनत घेतली व बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.