श्रीक्षेत्र अयोध्या येथे पहिले कीर्तन करण्याचा मान मिळाला शिवजन्मभूमीचे सुपुत्र डॉ. पंकज महाराज गावडे यांना…

हरिकीर्तनाने श्रीराम जन्मभूमी दुमदुमली

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र व युवा राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. प्राध्यापक डॉ. पंकज महाराज गावडे यांना नुकतेच श्रीक्षेत्र अयोध्या येथे हिंदीतील पहिले कीर्तन करण्याचा मान मिळाला. या मराठमोळ्या युवा राष्ट्रीय कीर्तनकाराच्या ‘जय श्रीराम’ या हरिनामाने आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या शिवगर्जनेने श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील नूतन रामलल्ला चे मंदिर दुमदुमून गेले.

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामलल्लासमोर श्रीराम मंदिराच्या प्रांगणात कीर्तन करण्याचा पहिला बहुमान हा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदासजी व महासचिव चंपत रॉय यांच्यामुळे गावडे यांना मिळाला. अशी माहिती ह भ प पंकज महाराज गावडे यांनी दिली.

या मराठमोळ्या युवा राष्ट्रीय कीर्तनकाराच्या ‘जयश्रीराम’ या हरिनामाने आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या शिवगर्जनेने श्रीराम जन्मभूमी मोठ्या उत्साहाने पुन्हा दुमदुमली. यावेळी रामलल्ला गर्भगृहात महाराजांचा व त्यांच्यासोबत असणारे गायक व वादक मंडळी त्यामध्ये प्रवीण महाराज सोळंके, गंभीर महाराज अवचार व श्रीकांत महाराज दुराफे आणि शशिकांत महाराज राऊत यांचाही विशेष सन्मान यावेळी ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

हिंदी भाषेतील पहिलेच कीर्तन

श्रीराम जन्मभूमी न्यास आयोजित डॉ. पंकज महाराज गावडे यांचे रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहातील मंडपात भारतातील पहिले वारकरी कीर्तन तेही संपूर्णतः हिंदी भाषेत झाले, कीर्तनासाठी निमंत्रित श्रोते, भाविक भक्त व महाराजांच्या समवेत असणारे वादक, गायक मंडळी यांनाच परवानगी देण्यात आली होती.यावेळी मंदिर न्यासाकडून संपूर्ण कीर्तन ध्वनिमुद्रित करण्यात आले.
या कीर्तनाला उपस्थित सर्व भाविक मंडळींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उभी असलेली रांगेतील भाविक मंडळी देखील गावडे महाराजांच्या कीर्तनात समरस झाली होती. टाळ्या वाजवत जय श्रीराम, जय शिवराय व रामकृष्ण हरी अशा उत्स्फूर्त घोषणा देत सर्वांनी या कीर्तनाला मोठा प्रतिसाद दिला.

अयोध्येतील कीर्तन सेवा झाल्यानंतर व महाराष्ट्रात परत आल्यावर खेड तालुक्यातील कडूस ग्रामस्थांकडून व वारकऱ्यांकडून रथावर भव्य मिरवणूक काढून पंकज महाराज व सहकारी मंडळी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
रामलल्लापुढे महाराष्ट्रातू आणलेल्या पावन मातीचा कलश आणि चांदीचे प्रभू श्रीरामलल्लाची मुर्ती नेऊन त्यांची पूजा करून तेथील रजकण आणि ज्या ठिकाण गर्भगृहात होमहवन झाले त्याची पावन रक्षा कलशात आणण्यात आली. या सोहळ्यानंतर मुख्य पुजारी आणि व्यवस्थापन मंडळींच्या हस्ते हा कलश पुन्हा पंकज महाराज यांच्याकडे सुपूर्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *