पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक, मीडिया यांच्या १६ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचे उद्घघाटन पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते !!
पुणे, २५ फेब्रुवारीः पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती आणि नवरात्र मंडळ यांच्यासह वाद्य पथक आणि मीडिया समावेश असलेली ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचा हा सलग तिसरा मौसम आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या ‘मीडिया’ असे १६ निमंत्रित संघ या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरूड गणपती मंडळ या गणपती मंडळांसह नवरात्र मंडळातील श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर तसेच ढोल ताशा वाद्य या पथकांमधील युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म या सर्ववादक तसेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा मीडिया संघ, अशा गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, वाद्य पथक आणि मीडिया क्षेत्रातील क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या स्पर्धेत १६ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.गुरूजी तालिम टायटन्स्, महालक्ष्मी मारव्हिक्स्, मंडई मास्टर्स, कसबा सुपर किंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, साई पॉवर हिटर्स, दगडुशेठ वॉरीयर्स, रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, नादब्रह्म ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ढोल ताशा, युवा योद्धाज् आणि मिडीया रायटर्स असे १६ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक असे घसघशीत पारितोषिक मिळणार आहे.या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५१ हजार रूपये आणि इलेट्रिकल बाईक देण्यात येणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. फेअर प्ले पुरस्कार जिंकणाऱ्या संघाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार्या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचे उद्धघाटन पुणे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते सकाळी ८:३० वाजता होणार आहे.
२०२२ वर्षीच्या स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने विजेतेपद तर, जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते.