‘महा स्पीडस्टार: शोध महा वेगाचा’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या वेगवान गोलंदाजांचा रंगणार थरार….

९ ते ३१ मार्च दरम्यान रंगणार शोध मोहिमेचा थरार

“भारतातल्या गल्लीबोळात क्रिकेट हा खेळ रुजलेला आहे. अनेक चांगले खेळाडू प्रतिकूलतेमुळे गुणवत्ता असूनही कारकीर्द घडवू शकत नाही. अशाच हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आश्वासक पाऊल टाकत महा ‘स्पीड स्टार : शोध महा वेगाचा’ ही महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांची शोध मोहीम हाती घेतली आहे. आजवर महाराष्ट्रात सर्वदूर क्रिकेटचा प्रसार व्हावा या ध्येयाने एमसीएने इन्विटेशन सामने व संघांची संख्या वाढवली, आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू केली. आता महाराष्ट्रातील क्रीडा नैपुण्याला ‘महा स्पीडस्टर: शोध महा वेगाचा’ या अनोख्या उपक्रमाचे कोंदण लाभणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी रजिस्ट्रेशन करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आमचे खेळाडू छोट्या खेड्यात, वाडीत, गल्लीत कुठेही असले तरी त्यांना क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.”, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहीत पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वेगवान गोलंदाज निवडले जावेत, यासाठी राज्यात पाच ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. याचा शुभारंभ ९ मार्च रोजी नाशिक येथे होणार आहे. तर समारोप ३१ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियम इथे होणार आहे. दरम्यान संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या शोध मोहिमेत राज्यातल्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, छोट्या गावातील, शहरातील गुणी खेळाडू क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात यावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. या स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
केवळ मुलेच नाही, तर मुलींवरही क्रिकेटचे जबरदस्त गारुड आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने मुलींसाठी सुद्धा हे व्यासपीठ खुले केले आहे. महा स्पीड स्टार स्पर्धेत मुले आणि मुली या दोघांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटात चुरशीचा थरार रंगणार आहे.

नोंदणी कशी कराल ?
“या मोहिमेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वेबसाईटवर (फॉर्मद्वारे) रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. संघटनेच्या इतर समाज माध्यमांवरही याविषयीची विस्तृत माहिती उपलब्ध असून खेळाडूंनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे. स्पर्धेचे ठिकाण व अधिक तपशीलवार माहितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची वेबसाईट व सोशल मीडिया हॅण्डल्स पाहावे.”, असे आवाहन संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर यांनी केले.

स्पर्धेचे वेळापत्रक
९ आणि १० मार्च रोजी नाशिक (उत्तर विभाग) आणि संभाजीनगर (मध्य विभाग), १६ आणि १७ मार्च रोजी नांदेड (पूर्व विभाग) आणि सोलापूर (दक्षिण विभाग), तर २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी पुणे (पश्चिम विभाग) या ठिकाणी वेगवान गोलंदाजांची शोध मोहीम पार पडणार आहे. या पाच विभागातून अंतिम फेरीत निवड झालेल्या गोलंदाजांची महाअंतिम फेरी ३१ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर पार पडणार आहे.

..अन् संधीची नवी दालने खुली होतील
या उपक्रमातील वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये यायची संधी मिळेल. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील. त्या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवले जाईल. विनामूल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून या खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना उचलणार आहे. त्यामुळे ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार, सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत, यासाठीची एक चळवळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *