शिंदे गटातील आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संतोष बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

२७ ऑक्टोबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. संतोष बांगर आपल्या १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संतोष बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. संतोष बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

मी कोणत्याही प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली नाही. मंत्रालयात जात असताना पोलिसांनी थांबवले आणि रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हतं.माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा असंही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *