शिरूरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

शिरूरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुड
शिरूर : दि. ०१/०२/२०२४.
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या जगन्नाथ कूलथे सराफ पेढीवर दोन दिवसांपूर्वी दोघा तरुणांनी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला होता. त्यावेळी या पेढीचे मालक अशोक कुलथे हे स्वतः दुकानात होते. त्यांच्या सोबत भिकाजी पंडित (वय वर्ष ५०) हे कामगार देखील होते. रात्री दुकान आवरण्याची लगबग सुरू असताना, अचानक दोघे तरुण दुकानात शिरून बंदुकीचा धाक दाखवत दरोड्याच्या तयारीत असतानाच, भिकाजी पंडित यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोरदार प्रतिकार करत या दोघांना दुकानाबाहेर लोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यातील एकाने बंदुकीतून फायरिंग केली. त्यामुळे परिसरातील लोक भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले होते.
ही घटना घडताच काही क्षणांत शिरूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज API संदीप यादव, API एकनाथ पाटील, PSI पवार, हवालदार प्रफुल्ल भगत, तसेच पुणे एल सी बी चे PSI गणेश जगदाळे, हवालदार जनार्दन शेळके, आदी पोलीस मोठ्या संख्येने आलेले होते. तसेच व्यापारी बांधव व अशोक कुलथे यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने जमा झालेला होता. अशोक कुलथे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला रीतसर या घटनेची फिर्याद दिलेली होती. पोलिसांनीही सर्व लोकांना आरोपी लवकरात लवकर पकडून देऊ असे आश्वासन दिलेले होते. त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (LCB) पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या संपूर्ण टीमने केलीय. सदर आरोपी हे पुण्याजवळील सिंहगड परिसरातील जंगलात लपले असल्याचे लोकेशन पोलिसांना मिळाल्याने, पोलिसांनी अथक परिश्रमाने दोघांना ताब्यात घेतले असून, पैकी एकजण शिरूर मधील काचे आळीतील असून त्याचे नाव शरद बन्सी मल्लाव (वय वर्ष २४) असे आहे. त्याचा दुसरा साथीदार पुणे येथील वडगाव धायरी मधील असून, त्याचे नाव सागर उर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय वर्ष २३) आहे. हे दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून, मल्लाव हा पुणे जिल्हा तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून हद्दपार आहे. मल्लाव कडून तीन गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. शरद मल्लाव ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार सागर (बबलू) सोनलकर जखमी असल्याने पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असून, त्यालाही पोलीस ताब्यात घेणार आहेत.


सदर तपास पथकात पुणे एलसीबी चे पोलीस उप निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांचा समावेश होता.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करत आहेत.
खरे तर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, तसेच शिरूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक या शिवाय अनेक अधिकाऱ्यांच्या या काळात बदल्या होऊनही, ही घटना खूप गंभीर असल्याने, पुणे पोलिसांनी खूप तत्परतेने आरोपी ताब्यात घेतल्याने, पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्व शिरूरकर खुश असून, शिरूर पोलीस व पुणे एलसीबी चे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच कुलथे सराफ यांच्या दुकानातील भिकाजी पंडित यांनी चोरट्यांचा केलेला प्रतिकार हा खूप वाखाणण्याजोगा असल्याने, त्यांचा सत्कार समस्त शिरुरकरांच्या वतीने करण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *