बी.डी.काळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१९ ऑक्टोबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित,बी.डी. काळे महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने नुकतेच एका राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन झूम अॕपवर आॕनलाईन पध्दतीने केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.सुरेशशेठ काळे हे होते. या वेबिनारचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ.विलास उगले यांनी केले. आपल्या उदघाटनपर भाषणात ते म्हणाले की,चातुर्वण्य समाजव्यवस्थेत आदिवासींचा समावेश नव्हता.आदिवासींचे पारंपरिक,धार्मिक व सांस्कृतिक जीवन वेगळे आहे.आदिवासी समाजाच्या विविध व्याख्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत. समानभाषा,विशिष्ट भूप्रदेश हे आदिवासी समाजाचे प्रभेदक लक्षण आहे.निसर्गाला बाधा न करता आदिवासी निसर्गाचे जतन व संवर्धन करतात.आवश्यक असेल तरच राब करतात. आदिवासी शेतकरी रासायनिक खते वापरत नाही.नैसर्गिक वस्तुंचा उपजीविकेसाठी ते वापर करतात.प्रश्न,समस्या,दुःख,दारिद्य इ.ना आदिवासी धैयाने सामोरे जातात.त्यामुळे ते आत्महत्या करत नाही. या सर्व वेगळेपणाची नोंद अभ्यासकांनी घ्यावी,असे ते शेवटी म्हणाले.या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. सखाराम डाखोरे, ‘रानवा’ कार, सहाय्यक प्राध्यापक, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसईरोड (प.) जि.पालघर यांनी “आदिवासी कवितेतील बदलत्या जाणिवा” या विषयावर अत्यंत मूलगामी विचार मांडले.डॉ.डाखोरे आपल्या भाषणात म्हणाले की, आदिवासी समाज व संस्कृती ही आर्यपूर्व काळातील असून इतक्या प्राचीन समाज व संस्कृतीला आज हिणवले जात आहे.कमीपणा दिला जात आहे. अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.ही अत्यंत खेदाची बाब आहे. आदिवासींच्या मौखिक साहित्याला हजारो वर्षाची थोर परंपरा आहे.

निसर्ग संवेदन, लोककथा,बोलीभाषा,आदिवासी क्रांतिकारक,मार्क्स – फुले – आंबेडकर – शाहू महाराज – बिरसा मुंडा इ.आदिवासी कवितेच्या प्रेरणा आहेत. आदिवासी कवितेच्या पहिल्या पिढीतील सर्वच कविंनी आपल्या कवितेतून आदिवासींच्या जीवंत व्यथा, वेदना, विद्रोह, भूक, दारिद्रय व्यक्त केलेल्या आहेत. ‘मोहोळ’ च्या संपादनातून आदिवासी कवितेचा पाया कच्चा नाही.तो पाया भक्कम आहे.हेच यातून सिद्ध होत आहे. पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कवी कॉ.वाहरू सोनवणे यांनी आपल्या ‘गोधड’ या संग्रहातून सौम्यपणे विद्रोह प्रकट केलेला आहे.त्यांची ‘स्टेज’ ही कविता प्रस्थापित व्यवस्थेला जबरदस्त चपराख आहे.त्यांच्या कवितेची शब्दकळा अस्सल आहे. डॉ.विनायक तुमराम यांच्या कवितेने आदिवासी अस्मितेची जाणीव करून दिली आहे.तर अस्तित्व शाबुत ठेवणारी जाणीव ‘उलगुलान’कार कवी भुजंग मेश्राम यांनी करून दिली आहे. कवी प्रा.माधव सरकुंडे यांच्या कवितेने निराशाग्रस्ततेची जाणीव करून दिली आहे.आपला धर्म व संस्कृती कोणती आहे?याचीही जाणीव कवी माधव सरकुंडे यांची कविता करून देते.आदिवासी स्रियांच्या व्यथा व वेदनांची जाणीव उषाकिरण आत्राम, कुसूम आलाम,कविता आत्राम, सीता भोजने,शीतल ढगे इ. ची कविता करून देते.या कवयित्रींच्या कवितेतून आदिवासी संस्कृतीची महानता स्पष्ट होत आहे.प्रस्थापित व्यवस्थेचा दुटप्पीपणाही अधोरेखित होतो आहे. घोटुल – युवागृहे या सांस्कृतिक ठेव्यातून प्रेमाचे स्वातंत्र्य मिळते आहे.यात स्वैराचार नाही.प्रेमाची उधळण करणारा आदिवासी समाज व संस्कृती आहे.हा समाज कधी दुजाभाव करत नाही.कवी सुनील कुमरे यांच्या कवितेतून कुपोषण, सांस्कृतिक भ्रष्टपणा, धार्मिक उन्माद इ.चे चित्रण येते.कवी प्रभू राजगडकर यांच्याही कवितेतून आदिवासी स्वातंत्र्याची जाणीव प्रकर्षाने स्पष्ट होत आहे.कवी वसंत कन्नाके यांची कविता आत्मशोधाची जाणीव व्यक्त करणारी आहे. कवी बाबाराव मडावी यांची कविता सामान्य आदिवासींचे दुःख प्रकट करते. भाकर आणि भूक हा त्यांच्या कवितेचा स्थायी भाव आहे.दलित कवितेसारखा विद्रोह आदिवासी कवितेत आहे.

बी.डी.काळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न

शहर,नगर, महानगरातील भौतिक सुविधेसाठी आदिवासींचे विस्थापन वाढत आहे. १९९० नंतरच्या नवीन पिढीतील आदिवासी कविंनी आपल्या कवितेतून विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) व यामुळे होणारे विस्थापन,नद्यावरील सरकारी आक्रमणे, शिक्षणाची उदासीनता, बोगस आदिवासींची घुसखोरी, विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन, भांडवलशाहीचे आक्रमण,जल, जंगल,जमीनीवरील स्वामित्व नष्ट होणे इ.अनेक प्रश्न व समस्यांचे चित्रण नव्या पिढीतील कवी जोरकसपणे करत आहे. १९९० नंतरच्या तरूण व नव्या कविंच्या कवितेत बदलत्या आदिवासी समाजजीवनाचेही चित्रण प्रभावीपणे होत आहे. ही अतिशय आनंददायी बाब आहे. असे ते शेवटी म्हणाले.या प्रसंगी प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.सुरेशशेठ काळे, उपाध्यक्ष मा.तुकाराम काळे, कार्याध्यक्ष मा.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंद काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन मा.अजितशेठ काळे,संस्थेचे पदाधिकारी,संचालक,सल्लागार इ.झूम अॕपवर आॕनलाईन उपस्थित होते.या वेबिनारसाठी देशभरातील ३०० जणांनी नावनोंदणी करून सहभाग नोंदविला आहे. विशेषतः गुजरात, कर्नाटक, गोवा इ.राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, अभ्यासक आॕनलाईन उपस्थित होते.या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक उपस्थित होते.आॕनलाईन वेबिनारसाठी प्रा.स्वप्निल डोके, प्रा.सचिन घायतडके,प्रा.सूर्यकांत कदम,श्री.सागर दिवेकर इ.नी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा.पोपटराव माने यांनी केले. प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *