(बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे)
गव्हाणवाडी/श्रीगोंदा
दि. 19/05/2021
नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या गव्हाणवाडी येथे जिल्हा सरहद्दीवर बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत, वाहन तपासणीसाठी तात्पुरती चौकी उभारलेली आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाचता नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव निघालेला सिमेंट ट्रेलर ट्रक क्र. (MH 12, LT 4050 ) वरील चालकाचा ताबा सुटल्याने, ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या ३० फुट खोल खड्ड्यात गेला. हा ट्रक चेक पोस्ट साठी तात्पुरत्या उभारलेल्या पोलीस चौकीपासून, फक्त एक फुट अंतरावरून घासून गेल्याने, क्षणभर येथे कर्तव्यावर असणाऱ्या बेलवंडी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता.
त्यामुळे 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' असेच म्हणावे लागेल.
यावेळी पुणे नगर महामार्गावरील गव्हाणवाडी फाटा येथील, घोडनदीवर असणाऱ्या सतरा कमानी पुलाजवळील चेक पोस्टवर, बंदोबस्तासाठी असलेले बेलवंडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक शोभा काळे, पो. कॉ. संदीप दिवटे, पो. हवालदार पोपट ठोकळ, हे. कॉ. किरण बारवकर, हे. कॉ. संपत गुंड, होमगार्ड संतोष लगड व अक्षय जगताप, या सर्व कर्मचाऱ्यांचा जीव बालंबाल वाचलाय. ठोकळ यांनी अंगावर येणार हा ट्रक पहिला व प्रसंगावधान राखत त्यांनी इतरांना जोरात बाजूला ढकलले. तर दिवटे यांची दुचाकी येथे उभी केलेली होती. त्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने दुचाकी खड्ड्यात गेल्याने, दूचाकीचे नुकसान झालेय.
[आपला आवाज न्यूज नेटवर्कला प्रतिक्रिया देताना येथे कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी शोभा काळे यांनी सांगितले की, नगर हून पुण्याच्या दिशेने येणारा भरधाव ट्रक, दुभाजकावर आदळून विरुद्ध बाजूने आमच्याकडे येताना आम्ही पाहिला. चौकीपासून ट्रक फक्त एक फुट अंतरावरूनच धडधड आवाज करत खड्ड्यात गेला. त्यामुळे आमच्या समोर साक्षात मृत्यु दिसत होता. पण दैव बलवत्तर म्हणून आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.]
या आधीही फक्त दोन दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडलेली होती. त्यात धान्य वाहून नेणारा ट्रक येथे पलटी झाला होता. आणि त्यात शिरूरच्या पोलिसांचा जीव वाचला होता.