आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
“महिला आज सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे हे कौतुकास्पद आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी क्रीडा स्पर्धांतून योग्य मार्गदर्शन करावे.अभ्यासाबरोबर खेळाला पण वेळ देऊन योग्य संस्कार पालकांनी आपल्या मुलांवर करावे.
शहराकडे जाण्यापेक्षा गावातील एकी व संघटना महत्वाची आहे.ग्रामीण भागातील मुलांना क्रीडा प्रशिक्षणासाठी योग्य प्रशिक्षक मिळण्याबरोबर विविध शिष्यवृत्त्यांची माहिती होण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य करावे”, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथे तळेघर बीटच्या यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खटावकर बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थीनीने गायलेल्या ईशस्तवन व स्वागतगीत आणि प्रमुख पाहुणे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी सरपंच शुभांगी साबळे,उपसरपंच सुनिल उंडे,पोलीस पाटील विजय केंगले, सामाजिक कार्यकर्ते राघव अष्टेकर,शिक्षणविस्तार अधिकारी शत्रुघ्न जाधव,केंद्रप्रमुख चिमा बेंढारी,वसंत गेंगजे,लहू घोडेकर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश शेळके, उपाध्यक्ष अनिता शेळके,सुभाष साबळे,निलेश साबळे,जीवन निसरड , दत्तात्रय गभाले ,जयराम साबळे,पांडुरंग साबळे,यमना साबळे ,शंकर साबळे , नंदू मसळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर म्हणाले, “ग्रामीण भागातील मातीत भविष्यातील अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू निर्माण करण्याची क्षमता आहे.पुस्तकांचा अभ्यास करूनच नाही तर खेळून सुद्धा आयुष्य मोठे करता येते.पालकांनी मुलांच्या चांगल्या गोष्टींचेच समर्थन करावे.मुलांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी मोबाईल,महागडे क्लासेस देण्यापेक्षा पालकांनी संस्कारक्षम मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे आहे.आपला गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी वृक्षलागवडीची चळवळ गावोगावी सुरु व्हावी.गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे.ज्या गावची मंदिरापेक्षा शाळा मोठी आहे ते गाव खऱ्या अर्थाने मोठे आहे.गाव व शाळेच्या विकासासाठी गावातील अधिकारी व नोकरदार वर्गाने योगदान द्यावे.भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू व प्रशासनातील अधिकारी गावातून निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे”.
वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात धावणे,उंचउडी,लांबउडी,थाळीफेक,गोळाफेक,वकृत्व व, भजन,प्रश्नमंजुषा,लोकनृत्य,कबड्डी,खो-खो आदी स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी बँक अधिकारी सुभाष साबळे,पुनाजी मसळे,नामदेव मसळे,पोलीस हवालदार अमोल शिंदे,नामदेव साबळे,सुरेश शिंदे,भामाबाई साबळे,बाळू निसरड ,गौरव शेळके, देवराम साबळे, सुरेश साबळे , शिवशंभो प्रतिष्ठान,ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती राजेवाडी,पुणे आणि मुंबईकर ग्रामस्थ तसेच शिक्षकवृंद केंद्र पोखरी,राजपूर,गोहे बु.॥ यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख लहू घोडेकर सुत्रसंचालन एकनाथ मदगे व संदीप माळी यांनी केले.आभार शिक्षणविस्तार अधिकारी शत्रुघ्न जाधव यांनी मानले.