मराठी पाट्यांच्या मुद्यावर शिरूर मनसेचे – तहसिलदार, पोलीस व पंचायत समितीला निवेदन

 विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर मनसेच्या वतीने मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आलेय. यात नमूद केलेय की, “कोर्टाचा आदेश डावलून मराठी पाट्या न लावलेल्या आस्थापनांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा अभिमान आहे. अनेक बोली अनेक संस्कृती पोटात घेऊन सर्वत्र संचार करणारी मराठी भाषा हजारो वर्षे जुनी आहे. आजवर कित्येक महाकाव्ये, ग्रंथ कादंबऱ्या, नाटके, कविता यामुळे मराठी साहित्य समृद्ध झालेले आहे. जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा निश्चित समावेश होतो. संत एकनाथ महाराज म्हणतात की, “मराठी ही कष्टकऱ्याची, ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची, घामाची, निर्मितीची भाषा आहे.”

 


मराठी ही ज्ञानभाषा आहे, धर्मभाषा आहे, अक्षरभाषा आहे, अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे. स्वतःचे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा असून, जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. भारतात प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. प्रत्येक राज्यात त्याच भाषेत दुकानावर पाट्या आहेत मग महाराष्ट्रात मराठी पाट्या लावण्यासाठी काय अडचण आहे ? मा सर्वोच्च न्यायालयाचे आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापनांवर मराठीमध्ये नामफलक लावण्यात यावे, असा आदेश दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सर्व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात असा इशारा दिलेला आहे. परंतु शिरूर तालुका व शिरुर शहरात येणाऱ्या हद्दीत सदर आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना त्यांचे नामफलक बदलण्यास विरोध करत असतील, त्यांच्यावर तात्काळ आदेश देऊन कारवाई करण्यात यावी. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही तर आपलेविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केलेप्रकरणी पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. ज्या ज्या आस्थापनांच्या मराठीत पाट्या नाहीत त्यांच्यावर मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करुन सदर बोर्डावर काळे फासण्यात येईल, असे पत्र तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती शिरुर या कार्यालयांना मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी दिले आहे.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, शहराध्यक्ष ॲड. आदित्य मैड, संतोष नरके, माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहित कक्षाचे माजी शहराध्यक्ष रवी लेंडे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, रस्ते आस्थापनाचे शहराध्यक्ष संजोग चव्हाण, महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, तारू आक्का पठारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *