बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराला लागून असलेल्या जुने शिरूर म्हणजेच रामलिंग रोडवरील मोती नाल्याजवळ काही विध्वंसक वृत्तीचे लोक व काही व्यावसायिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे शिरूर ग्रामीण ग्राम पंचायत हद्दीत प्रवेश करताच येथील कचरा सर्वांचे स्वागत करतो. त्यावर अनेक वेळा बातम्या प्रसारित झाल्यात. ग्राम पंचायतनेही अनेकदा येथे साफ सफाई केली. परंतु लोकांना लागलेल्या घाण सवयींमुळे येथे काही ठराविक लोक कचरा आणून टाकत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यावर उपाय म्हणून शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतने या ठिकाणी सीसी कॅमेरा बसवून कचरा न टाकण्याचा नोटीस बोर्ड (फ्लेक्स) काही महिन्यांपूर्वी लावलेला होता. परंतु तरीही या ठिकाणी खूप मोठा कचरा साठलेला आहे. विशेष म्हणजे येथील नोटीस बोर्ड (फ्लेक्स) देखील आता त्या ठिकाणी दिसत नाही. खोडसाळपणे तो कुणीतरी काढून टाकलेला आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण आणखी वाढलेले आहे. येथील एकुलत्या एक कॅमेऱ्याच्या नाकावर टिच्चून काही निर्ढावलेले समाजकंटक, अगदी त्याच्या समोरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे या सीसी कॅमेऱ्याच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा एकुलता एक सीसी कॅमेरा लावल्यावर व तेथील सूचना फलकामुळे काही दिवस कचरा होत नव्हता. सीसी कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून काही लोक जागा बदलून थेट पुलावर व ओढ्यात कचरा टाकत होते. त्यामुळे येथे दोन्ही बाजूला दोन सीसी कॅमेरे असणे गरजेचे आहे. परंतु आता तो सूचना फलकच गायब झाल्याने सीसी कॅमेऱ्याला लोक जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र लोकांच्या अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकण्यामुळे मात्र येथील कचऱ्यावर कुत्र्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असुन या कुत्र्यांमुळे अपघात होत आहेत.
अलीकडेच शिरूर नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांना पकडुन त्यांना लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली होती. त्याला घाबरून काही कुत्रे शिरूर ग्रामीण हद्दीत आल्याचे लोक सांगत आहेत. त्यामुळे येथील कचरा व कूत्र्यांमुळे या ठिकाणी नेहमी अपघात होत आहेत. असाच अपघात कुत्र्यामुळे सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी होऊन, दुचाकीस्वार डांबरी रस्त्यावर पडून फरफटत गेल्याने चांगलाच सोलवटला आहे. त्याच्या अंगावर अनेक जखमा होऊन तो रक्त बंबाळ झाला होता. दुचाकीवर महिला व एक लहान बाळ होते, नशीब चांगले म्हणून त्यांना जास्त इजा झाली नाही. शिवाय या रस्त्यावर खूप वर्दळ असते. या वेळेत एखादे मोठे चारचाकी वाहन येथून गेले नाही. आणि त्यामुळे येथून वाहणाऱ्या या मोठ्या वाहनांचा ते बळी ठरले नाहीत. कारण या रस्त्यावर अशाच एका अपघातात काही आठवड्यांपूर्वीच एका शालेय विद्यार्थिनीचा हकनाक बळी गेलेला होता.
रामलिंग रोडवरील मोती नाल्याजवळच्या या कचऱ्याबाबत शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी तसेच सध्याचे प्रशासक तथा ग्रामविस्तार अधिकारी आर आर राठोड यांच्याशी आपला आवाजने संपर्क साधला असता केदारी यांनी सांगितले की, प्रत्येक कॉलनीत कचरा गाडी येत असते, नागरिकांनी तीच्यातच कचरा टाकावा, जर काही समस्या असतील तर ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांनी ग्राम पंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा परंतु रस्त्यावर कचरा टाकू नये, अन्यथा अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
परंतु येथील काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार कचरा गाडी ही दिवसा आड येत असून, ती दररोज पाठविण्याची मागणी पुढे येत आहे. तसेच सार्वजनिक पाणी पुरवठाही दररोज करण्याची लोकांची मागणी पुढे येत आहे. काँक्रिट रस्ते व ड्रेनेजच्या समस्या अनेक ठिकाणी आहेत, त्या पूर्ण करण्याची मागणी समोर येत आहे. तसेच अनेक कॉलन्यांमध्ये घरांची अतिक्रमणे झालेली आहेत, काहींनी वॉल कंपौंड रस्त्यात बांधलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यातच झाडे लावलेली आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक रस्ते हे काहींच्या मालकीचे झालेत की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाने मोहीम हाती घेऊन व सर्व रस्त्यांचा सर्व्हे करून अशा लोकांना नोटिसा देणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे आणखी समस्या व विनाकारण वाद वाढण्याच्या संभावना आहेत.
नुकत्याच या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून, नवनियुक्त सरपंचांनी कायदेशीर पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेक आर्थिक विकास कामांसाठी ठोस निर्णय घेणे शक्य नसल्याने अनेक कामे रखडलेली आहेत. परंतु येत्या आठवड्यात सरपंच, उपसरपंचांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही प्रलंबित कामे किती जोर धरतात ? याकडेच सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. नवनियुक्त सरपंच कु. शिल्पा दिलीप गायकवाड या उच्चशिक्षित असुन, त्यांचे चुलते संदीप ज्ञानदेव गायकवाड हे शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक होते. शिरूर नगरपरिषद हद्दीत अनेकदा संदीप गायकवाड यांनी स्वतः व त्यांच्या काही मित्रांच्या सहकार्याने साफसफाई व स्वच्छता केलेली होती. त्यांच्या या कामाची सर्वत्र खूप स्तुतीही झालेली होती. त्यामुळे नगर परिषदेने त्यांना स्वच्छता दूत म्हणून पुरस्कृत केलेले होते. तशीच स्वच्छता ते आता वास्तव्यास असलेल्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीत करतील का ? आणि येथील स्वच्छतेसाठी ते आता नवनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या आपल्या पुतणीला प्रोत्साहन देतील का ? आणि त्यांच्या या कार्यास येथील गावकारभारी साथ देतील का ? स्वच्छ व सुंदर शिरूर ग्रामीण ग्राम पंचायत होऊन एखादा शासकीय पुरस्कार मिळेल का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
तुर्तास मोती नाल्याजवळील कचऱ्याची कायमची समस्या मिटविण्यासाठी ग्रामपंचायत काय ठोस उपाययोजना करतेय हेच पाहणे औत्सूक्याचे बनलेले आहे.