अमूल क्लिन फ्युएल कार रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ

पिंपरी ( प्रतिनिधी ):

येत्या २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिन साजरा करण्यानिमित्त आयोजित अमूल क्लिन फ्युएल बायोसीएनजी कार रॅलीला खेड येथून झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये १२ बायोसीएनजी कार सहभागी असून मुंबई आणि गुजरातमधील अनेक शहरांतून मार्गस्थ होत रॅलीचा येत्या २६ नोव्हेंबरला आणंद येथे समारोप होणार आहे. भारताचे दुग्धपुरूष (मिल्कमॅन ऑफ इंडिया) असलेल्या डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंती दिनाचे म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध दिनाचे (नॅशनल मिल्क डे) औचित्य साधून हा उपक्रम साजरा केला जात आहे.
देशातील दुग्धोत्पादन क्रांतीचा पुरावा आणि चक्रीय अर्थव्यवस्था व शाश्वत शेती यांप्रतीची कटिबद्धता असलेल्या या रॅलीचा प्रारंभ गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (जीसीएमएमएफ–अमूल फेडरेशन) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. अमूल फेडरेशन, मारुती सुझूकी इंडिया या संस्थांतील मान्यवर तसेच डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कन्या निर्मला कुरियन याप्रसंगी उपस्थित होते.
रॅलीच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना श्री. मेहता म्हणाले, “अमूल क्लिन फ्युएल बायोसीएनजी रॅलीसाठी मारुती सुझूकीशी सहयोग करताना आम्ही हर्षोत्सुक आहोत. गाईच्या शेणाचे बायोगॅसमध्ये रुपांतर, दुग्धोत्पादन अधिक पर्यावरणपूरक व शाश्वत बनवणे आणि दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे अशा नव्या क्रांतीच्या लाभाचा गौरव व प्रसार करण्याचे उद्दिष्ट्य या सहयोगामागे आहे. भारतातील सर्वाधिक विश्वसनीय खाद्य ब्रँड असलेला अमूल व भारतातील सर्वाधिक वहन होणारा कार ब्रँड मारुती सुझूकी एकत्रितपणे शाश्वत शेती आणि दुग्धोत्पादन क्रांतीचा संदेश जगाच्या काना-कोपऱ्यात पोचवतील.”
मारुती सुझूकी इंडिया लिमिटेडचे संचालक (शाश्वतता/सस्टेनेबीलिटी) केनिचीरो टोयोफुकू म्हणाले, “भारतात बायो-सीएनजी हे उच्च शाश्वत प्रवास इंधन पर्याय असून जागतिक तापमानवाढ कमी करण्यात त्याने उल्लेखनीय परिणाम दाखवून दिला आहे. टीईआरआयच्या (TERI) संशोधनानुसार पेट्रोल वाहने, इलेक्ट्रिक वाहने व बायो-सीएनजी वाहने यांच्या प्रति किलोमीटर वहनात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण अनुक्रमे १८४ ग्रॅम, १५० ग्रॅम व -१,०९७ ग्रॅम इतके आहे. यावरुनच बायो-सीएनजी हे सर्वोत्कृष्ट कमी कार्बन असलेले व पर्यावरणात शून्य कार्बन उत्सर्जन करणारे इंधन असल्याचे स्पष्ट होते. सुझूकी कंपनी बायो-सीएनजी इंधनाचा प्रचार करत असून अमूल संलग्न डेअरीसमवेत ४ बायो-सीएनजी प्रकल्प स्थापन करण्याची योजना आखत आहे.”
गाईच्या शेणाचे सेंद्रीय खत व बायोगॅसमध्ये रुपांतर करण्याच्या या नव्या पुढाकारात दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वयं-शाश्वत चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे सुप्त सामर्थ्य आहे. त्याहीपुढे तो शेतकऱ्यांचे सक्षमीकरण घडवेल, आरोग्यपूर्ण व पोषक दुग्ध उत्पादनांची निर्मिती करेल आणि पर्यावरण व भावी पिढ्या यांच्या कल्याणात योगदान देईल.
अमूल क्लिन फ्युएल बायोसीएनजी कार रॅली मंगळवारी मुंबईत पोचेल व नंतर वलसाड, सुरत, भडोच, वडोदरा, स्टॅच्यु ऑफ युनिटी, गोध्रा, हिम्मतनगर, पालनपूर, मेहसाणा, अहमदाबाद या शहरांतून मार्गक्रमण करत १,४०० किलोमीटरहून अधिक अंतर कापून २६ नोव्हेंबरला आणंद येथे समाप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *