रामलिंग रोड वर पुन्हा अपघात : गतिरोधक बसविण्याची स्थानिकांची मागणी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिरूर ग्रामीण ग्राम पंचायत हद्दीतील रामलिंग रोड वर अनेक शाळा व नवीन वसाहती झाल्याने, येथे रहदारीचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे. शिवाय हा रस्ता पुढे जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर तालुक्याकडे तसेच पुणे, मुंबई व नाशिक जिल्ह्याकडे जातो. सध्या या रोडवरून अष्टविनायक महामार्गाला व भीमाशंकर महामार्गाला जाता येते. हा रस्ता पूर्वी शिरूर – भीमाशंकर म्हणून ओळखला जायचा, आता तो नव्याने प्रस्तावित असणारा शिरूर – पनवेल – उरण महामार्ग असुन, तो राजगुरूनगर मार्गे पुढे सह्याद्रीतील नवीन घाट मार्गे जाणार आहे.
शिरूर तालुक्याच्या अनेक गावांकडे हा रस्ता जात असल्याने, यावरील वाहतुकीची वारंवारीता खूप आहे. परंतु त्या तुलनेत रुंदिने हा रस्ता खूप कमी पडत असून, रामलिंगच्या पाण्याच्या टाकीपासुन ते शिक्षक कॉलनी पर्यंत उताराचा रस्ता आहे. त्यामुळे वाहने खूप अधिक गतीने वाहत असल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यात अनेकांचे जीवही गेलेत. या रस्त्यावर अनेक शाळा असल्याने, विद्यार्थी व पालक आपला जीव मुठीत घेऊन पायी व सायकलवर प्रवास करत आहेत. पायी चालणाऱ्यांनाही अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागत आहे. आज मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीही असाच एक अपघात होऊन, चार चाकी मालवाहतूक गाडीने दुचाकीवरील दोघांना उडविल्याने, दुचाकीवरील दोघे रस्त्याच्या कडेला पडून, त्यातील मागे बसलेल्या महिलेस जबर मार बसला आहे. तर काल सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी याच रोडवर अण्णापूर हद्दीत एका मालवाहतूक चारचाकी गाडीला धडकून एका इसमाचा मृत्यू झाला होता. तसेच ५-६ दिवसांपूर्वी रामलिंग जवळील एका कॉलनीच्या जवळ एका मालवाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे या रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे येथील प्रवासी व स्थानिक नागरिकांनी, येथील प्रत्येक कॉलनीच्या चौकात गतिरोधक व रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी केलेली आहे. तसेच शाळांच्या बाहेर हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधकांसह रिफ्लेक्टर व नामफलक (इंडिकेशन्स) बसविण्याची मागणी पुढे येत आहे.
आता स्थानिकांच्या या मागणीची शिरूरचा सार्वजनिक बांधकाम विभाग कधी पूर्तता करतोय, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आपला आवाज ने सातत्याने रामलिंग रोड वरील अपघातांच्या अनेक वर्षांपासून बातम्या केलेल्या असुन, सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरती मलमपट्टी करून सांत्वन करताना दिसत आहे. परंतु नियमानुसार करता येणारे गतिरोधक, रीमलर स्ट्रिप व इंडीकेशन्स बसविण्यात हा विभाग अद्यापही हलगर्जीपणाच करत असल्याने, शिरूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेबद्दल लोक आता प्रश्न उपस्थित करत आहेत.
आता आणखी एखादा अपघात होऊन त्यात आणखी एखादा मृत्यू होण्याची तर वाट हे अधिकारी बघत नाहीत ना ? असा संतप्त सवाल आपला आवाज न्यूज नेटवर्क समोर उभा राहिला असुन, जोपर्यंत या मार्गावर योग्य निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा आम्ही करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *