स्मार्ट सिटीची सर्व कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करणार : आयुक्त शेखर सिंह

दि. १३/०१/२०२३
पिंपरी

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेली स्मार्टसिटीची ३० जूनपूर्वी पूर्ण केली जातील अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ शेखर सिंह यांनी दिली.

शुक्रवारी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्मार्ट सिटी ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी ऑप्टीकल फायबर नेटवर्क सिस्टीम हे स्मार्ट सिटीच्या पायाभूत सुविधांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. स्मार्ट सिटी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी आणि अद्ययावत व योग्य कृतीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट सिटी फायबर ऑप्टीकल नेटवर्क सिस्टीमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली स्मार्ट उपकरणे (उदा. सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि डिस्प्ले बोर्ड (VMD), स्मार्ट ट्रॅफीक, स्मार्ट पार्कीग ) सिटी नेटवर्कच्या माध्यमातून Integrated command & control centre (ICCC) ला जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये एकूण 600 किमी अंतराचे ऑप्टिकल फायबर नेटवर्कव सतराशे पोलचे जाळे टाकण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीस उत्पन्न मिळणार आहे. तसेच वारंवार होणा-या गैरसोयीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही पायाभूत सुविधा खूप मोठी असून डक्ट आणि केबल्सद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीसाठी महसूल मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *