पीसीसीओईआर मध्ये औद्योगिक संस्थांची परिषद
पिंपरी, पुणे – केंद्र सरकारने नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) ही औद्योगिक अस्थापनांना तंत्र कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सर्वसामान्य विद्याशाखेच्या पदवीधर उमेदवारांना अभियांत्रिकी विभागातील ज्ञान आत्मसात करण्याची इच्छा आहे; त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळत आहे. अधिकाधिक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करावे, असे आवाहन बोर्ड ऑफ अँप्रेंटीशीप ट्रेनिंग (बोट) चे पश्चिम विभागीय संचालक पी. एन. जुमले यांनी व्यक्त केले.
एनएसटीएस मुंबई विभाग, पिंपरी पुणे एज्युकेशन ट्रस्ट, पीसीसीओईआर, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि औद्योगिक संस्थेतील प्रमुख प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘बोट’चे पश्चिम विभाग उपसंचालक एन. एन. वडोदे, टाटा मोटर्सचे मनुष्यबळ विकास अधिकारी सिताराम कंदी, टाटा ऑटो कंपोनंट लि. चे उपाध्यक्ष गजानन मोरे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीच्या प्लेसमेंट विभाग अधिष्ठाता व माटपो अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील ट्रेडिंग अँड प्लेसमेंट विभागाचे तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते.
एनएटीएस शैक्षणिक योजनेंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना एक वर्षापर्यंत तर कला, वाणिज्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. त्यासोबतच विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी प्रमाणपत्र दिले जाते. या योजनेमुळे कुशल मनुष्यबळाचे सुमारे एक ते दीड लाख रोजगार निर्माण होतील असा विश्वास एन. एन. वडोदे यांनी व्यक्त केला.
स्वागत, प्रास्ताविकात डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी परिषदेचा हेतू विशद केला. पीसीईटी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि कुशल तंत्रज्ञ विकासाला सातत्याने चालना देते. त्यामुळे पीसीईटी शैक्षणिक संकुलाचा देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक वाढतो आहे, असे डॉ. रवंदळे यांनी सांगितले.
आभार डॉ. हरीश तिवारी यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी परिषदेस आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.