शिरूर येथे तरुणांनी स्थापन केली सलोखा समिती : गणपती व मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १२/०९/२०२३.

शिरूर शहरातील अनेक तरुणांनी एकत्र येत “शिरूर शहर सलोखा समिती” या नावाने समिती स्थापन केली असून, ही समिती चक्क व्हॉट्स ॲप ग्रूप द्वारे आवाहन करत व त्यावर चर्चा करत स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून तुकाराम खोले यांची व्हॉट्स ॲप ग्रूप द्वारेच निवड करण्यात आली असली तरी देखील आम्ही सर्व सदस्य म्हणजेच अध्यक्ष असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्यासह अनेक सदस्यांनी दिलेय.
येत्या काही दिवसांत गणपती बसणार असुन, गणपती विसर्जना दिवशीच इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद – ए – मिलाद आहे. त्यामुळे हिंदू व मुस्लिम बांधवांच्या मिरवणुका एकाच दिवशी निघणार आहेत. मात्र अनेक ठिकाणी या दोन्ही मिरवणुका वेगवेगळ्या दिवशी काढण्याचे ठरल्याचे दिसत आहे.
परंतु शिरूर शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी नेहमीप्रमाणे एकत्र येत व सर्वानुमते हे दोन्ही विसर्जन कार्यक्रम एकाच दिवशी ठेवत, कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू न देण्याचा ठाम निर्णय घेत सर्वांना एक चांगला संदेश देण्याचे ठरविलेले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात दि ७ सप्टेंबर २०२३ रोजी, या नव्याने स्थापन केलेल्या सलोखा समितीची पहिलीच मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगसाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, महावितरण शिरूरचे उपकार्यकारी अभियंता एस व्ही जाधव, माजी जी प अध्यक्ष प्रदीप कंद, भाजप तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान शहीदखान पठाण, शिरूर शहर विकास आघाडी प्रमुख ॲड सुभाष पवार, लोकशाही क्रांती आघाडी, शिरूर अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगरसेवक अभिजित पाचर्णे, मुस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, सुभाष चौक गणपती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरकाका परदेशी, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष (अ प गट) शरद कालेवार, ॲड रवींद्र खांडरे, ॲड प्रदीप बारवकर, संतोष शितोळे, बिजवंत शिंदे, प्रकाश थोरात, फिरोज बागवान, शाबान शाह, अर्शद शेख, भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा चिटणीस रेशमा शेख, मनसेच्या डॉ वैशाली साखरे, आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, प्रीती बनसोडे तसेच माया गायकवाड आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

 


यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. त्यात उपस्थितांमधुन ॲड शिरीष लोळगे यांनी मिरवणूक रात्री लवकर संपाविण्याची सूचना केली. मायाताई गायकवाड यांनी धार्मिक स्थळांजवळ वाद्य न वाजविण्याची सूचना केली. डॉ वैशाली साखरे यांनी तळीरामांचा बंदोबस्त करण्याची सूचना मांडली. बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद यांनी जैन बांधवांची उपस्थिती मीटिंगला कमी असल्याचे दर्शवत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही काही सूचना असतील तर त्या घेण्याचे मत व्यक्त केले. माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी शिरूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदाने राहत असल्याचे सांगितले. शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार यांनीही मनोगतात स्पष्ट केले की, शिरूरचा सर्वधर्मीयांचा इतिहास हा चांगला असून, सर्वांचे ऐक्य टिकून असल्याने कुणीही काळजी करू नये असे ठामपणे सांगितले. मुस्लिम जमातचे उपाध्यक्ष नसीम खान यांनी बाजार पेठेतील अरुंद रस्त्यांमुळे होणारी गर्दी व तेथील व्यवस्थेकडे लक्ष देण्याची सूचना मांडत, गणपती विसर्जन मिरवणूक दुपार नंतर काढण्याची व सकाळी मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणूक काढून ती दुपार पर्यंत संपविण्याचे मत मांडले. जाकिरखान पठाण यांनी शिरूरच्या हिंदू मुस्लिम व इतरही धर्मियांच्या ऐक्याची अनेक जुनी उदाहरणे देत, सर्वांचा सलोखा चांगलाच असल्याचे सांगत नवीन स्थापन झालेल्या सलोखा समितीलाही शुभेच्छा दिल्या. लोकशाही क्रांती आघाडी शिरूरचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी आपल्या मनोगतात शिरूरच्या चांगल्या परंपरेनुसार सर्वांनीच सलोखा राखण्याचे आवाहन करत, राज्यातील सध्याच्या मोर्चे व रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना करत, काही लोकांकडून शिरूरची शांतता भंग करण्यात येऊ शकते अशीही शंका व्यक्त केली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते प्रदीप कंद यांनी शिरूरच्या ऐक्याविषयी सांगताना आजी माजी आमदार तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत शिरूर शहराचा एकोपा टिकवून ठेवण्यासाठीच्या योगदानाची उदाहरणे देत, अशीच चांगली परंपरा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी शिरूरला येण्यापूर्वी शिरूरच्या धार्मिक ऐक्याविशयी माध्यमांद्वारे खूप ऐकले होते. आत्ताही सर्वांनी शिरूरच्या ऐक्याविषयी खूप चांगले सांगितले. आम्ही पोलीसही शिरुरची हीच चांगली प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी तयार आहोत. परंतु जर कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याचीही दक्षता घ्यावी. तसेच आलेल्या सुचनांनुसार MSEB, PWD, नगर परिषद, लाईफ गार्ड ई. सर्व विभागांशी बैठक घेऊन नियोजन केले जाईल, तसेच तळीरामांचाही बंदोबस्त केला जाईल असे आश्वासनही दिले.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आता सण व उत्सवांचा काळ सुरू होतोय, त्यामुळे सर्वांनीच गुण्या गोविंदाने व सलोख्याने राहावे. एकमेकांचा आदर करावा. वाद व तेढ निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आज देखील शिरूर येथे तुम्ही स्थापन केलेल्या सलोखा समितीने बैठक आयोजित केलीय व त्यात तरुणांसह जुन्या पिढीतील लोकही बरोबर घेतलेत ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्या नोकरीच्या कालखंडात मी कधीच वर्तमान पत्रात किंवा अन्य सोशल मीडिया मध्ये वाचले नाही, की शिरूरमध्ये कधी जातीय व धार्मिक ताण तणाव निर्माण झालाय व त्यातून काही अनुचित प्रकार घडलाय. त्यामुळे तुमची हीच चांगली परंपरा कायम ठेवावी. मी सर्वच विभागांच्या बैठका घेऊन त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने सांभाळण्याच्या सूचना देतोय. सर्वांनीच प्रशासनाशी सलोखा ठेवावा. आपणा सर्वांना मी येत्या काळातील सर्व सण उत्सवांना शुभेच्छा देतो.”
सलोखा समिती बैठक सुरळीत होण्यासाठी समिती सदस्य विनोद भालेराव, रजुद्दिन सय्यद, हाफिज बागवान, मितेश गादिया, मयुर नहार, तुकाराम खोले, कलीम सय्यद, मंगेश खांडरे, सागर नरवडे, सागर पांढरकामे, एजाज बागवान, राहील शेख, सुनील जाधव, स्वप्नील रेड्डी, वसीम सय्यद, अविनाश जाधव, निलेश जाधव, अमित शिर्के, संपत दसगुडे, असिफ शेख यांनी अमूल्य सहकार्य केल्याची माहिती सलोखा समिती सदस्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *