मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही – वसंत मोरे

१० डिसेंबर २०२२


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक, माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार का? अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पुण्यात त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मला काल रात्री भेटण्यासाठी या असा फोन आला होता. आमच्यात ४० मिनिटं चर्चा झाली. तुमची बाजू जाणून घेण्यासाठी भेटायला बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मी माझ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. आमच्या भेटीनंतर कोअर कमिटीलाही त्यांनी भेटीला बोलावलं आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

मी शहराध्यक्ष असताना २० ते २५ नगरसेवक निवडून येण्यासाठी आखलेली योजना त्यांना दाखवली. या गोष्टींना कुठे तरी छेद दिला जात असून, त्याबद्दल मी चर्चा केली. त्यांनी मला तुमची भूमिका माझ्या लक्षात आली असून, राज ठाकरेंशी चर्चा करु असं सांगितलं अशी माहिती दिली. मी माझी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर क्लिप टाकली होती. त्यानंतर मी स्पष्ट केलं होतं. मला जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो. मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही. इतर पक्षातील लोक जर मला त्यांच्या पक्षात घेण्यास इच्छुक असतील तर यात माझी चूक नाही,असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *