अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


आदित्य ठाकरे यांनी आधी वरळीतील आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांच्या राजीनाम्यानंतर मी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देतो. दोन वर्षांनी कशाला, दोघेही आताच पुन्हा निवडणूक लढवू. कोण जिंकतो ते पाहूयात. ठाकरे यांनी पुन्हा वरळीतून विजयी होऊन दाखवावे, असे खुले आव्हान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

पुण्यात फलोत्पादन मूल्यसाखळी क्षमतावृद्धी व संधी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्‍घाटन समारंभासाठी सत्तार पुण्यात आले होते. या समारंभापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे यांना हे आव्हान दिले. राज्यात दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत त्यांचे काय होते, हे त्यांना कळेल, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदारांना नुकतेच डिवचले होते. त्यावर अब्दुल सत्तार यांनी ठाकरे यांना हे खुले आव्हान दिले.

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन वर्षे कशाला वाट पाहायची, आताच ट्रायल मॅच होऊन जाऊ द्या. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठवडाभरात याबाबतची बातमी दिसेल. मात्र आदित्य ठाकरे यांनी आधी वरळीतील आमदारकीचा राजीनामा द्यावा, मी सिल्लोडच्या आमदारकीचा राजीनामा देतो. मग समोरासमोर लढाई करून दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ द्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *